Fri, Jun 05, 2020 15:05
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › कैद्याची पोलिस अधिकाऱ्याला मारण्याची धमकी

कैद्याची पोलिस अधिकाऱ्याला मारण्याची धमकी

Published On: Jan 21 2019 6:14PM | Last Updated: Jan 21 2019 6:17PM
नाशिक : प्रतिनिधी 

कैद्याला न्यायालयीन कामासाठी घेवून जात असताना कैद्यानेच चक्क पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करत पोलिस उपनिरीक्षकला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह आवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात या कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गुन्हेगारांची दहशत वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

कैदी सुरेश उर्फ पिण्या भरत कापसे (रा.अंतरवली, ता.शेवगाव, जि.अहमदनगर) हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. औरंगाबाद न्यायालयाच्या आदेशानुसार कापसेला ताब्यात घेण्यासाठी बीड ठाण्याचे पोलिस गेले होते. दरम्यान कापसेने पोलिस वाहनात बसवत असताना पोलीस उप निरीक्षक जोगदंड यांना त्याच्या वकिलाला फोन करण्यास सांगितले. मात्र जोगदंड यांनी त्यास नकार देताच त्याने त्यांना धक्काबुक्की केली. 

यावेळी मध्यस्थीसाठी धावून गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ देखील केली. तसेच जोगदंड यांना तुमचे घर पाहिले आहे, मी पाच पन्नास लाख रुपये खर्च करून  तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तसेच आरडाओरड करत आपल्याला न्यायालयात यायचे नाही तर जेलमध्येच राहायचे आहे, असे सांगत गोंधळ घातला. याप्रकरणी जोगदंड यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नाशिकरोड पोलिस करीत आहेत.