Mon, Nov 18, 2019 10:06होमपेज › Nashik › आदिवासी विकास भवनची बत्ती गूल

आदिवासी विकास भवनची बत्ती गूल

Published On: Aug 23 2019 1:33AM | Last Updated: Aug 22 2019 11:38PM
नाशिक : प्रतिनिधी

आदिवासी विकास विभागाचे संपूर्ण राज्याचे मुख्यालय असलेल्या आदिवासी विकास भवनची गुरुवारी (दि.22) दुपारी दोन तास बत्तीगुल झाली होती. वीजपुरवठा अचानक खंडित झाल्याने दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे राज्यभरातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. 

आदिवासी विकास भवनमध्ये पहिल्या मजल्यावर नाशिक अपर आयुक्त कार्यालय, दुसर्‍या मजल्यावर आयुक्तालय तर तिसर्‍या मजल्यावर आदिवासी विकास महामंडळ, जातपडताळणी, शबरी महामंडळ आदी कार्यालये आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यातून कामानिमित्त विद्यार्थी-पालक आणि नागरिकांचा परिसरात मोठा राबता असतो. मात्र, मागील दोन दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे.

आदिवासी विकास भवनमध्ये आयुक्तालय वगळता जनरेटरची व्यवस्था नाही. तर आयुक्तालयाच्या जनरेटरचे डिझेल बुधवारीच (दि.20) संपले होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी डिझेलअभावी आयुक्तालयात तब्बल दीड तास अंधार होता. अखेर दीड तासांच्या प्रतीक्षेनंतर डिझेल आणून जनरेट सुरू करण्यात आले. मात्र, तोपर्यंत दिवस संपायला काही काळच शिल्लक राहिला होता. तर आयुक्तालय वगळता इतर कार्यालयामध्ये अंधाराचे साम्राज्य कायम होते.  

दरम्यान, अंधार असल्याचे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चांगलीच मज्जा झाली. त्यांनी काम बंद ठेवून येणार्‍या नागरिकांच्या अडचणीत अजून भर टाकली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. अधिकारी वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने वैतागल्याचे दिसून आले.