Wed, Jun 03, 2020 20:45होमपेज › Nashik › लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप!

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप!

Published On: Jan 08 2019 1:36AM | Last Updated: Jan 08 2019 1:03AM
दिंडोरी : वसंत कावळे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना-भाजपामधील संभाव्य युतीवर राजकीय भवितव्य अवलंबून असलेल्या खासदारकी व आमदारकीसाठी जोरदार तयारी करणार्‍या इच्छुकांकडून वेळप्रसंगी कोणताही झेंडा हाती घेण्याची तयारी सुरू असून, त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील राजकीय वर्तुळात भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण भाजपाच्या माध्यमातून सलग तीनवेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असले तरी या मतदारसंघात भाजपाचे अस्तित्व तसे नगण्य आहे. ज्या शिवसेनेच्या ताकदीवर खा. चव्हाण यांनी सलग तीनवेळा दिल्ली गाठली, त्या शिवसेनेने युती होवो अथवा न होवो वर्षभरापूर्वीच माजी आमदार धनराज महाले यांनी लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून दिल्यामुळे खा. चव्हाण यांच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खासदार संजय राऊत यांनी तालुका दौर्‍यावर असताना महाले यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले खरे पण आता ऐनवेळी शिवसेना-भाजपा मनोमिलन होण्याची संभाव्य परिस्थिती पाहता शिवसेनेने केलेल्या तयारीचे व खासदारकीचे वेध लागलेल्या इच्छुकांचे काय, हा प्रश्‍न निर्माण होणार असून, संभाव्य युतीची शक्यता गृहीत धरून इच्छुकांकडून प्लॅन-बी ची तयारी सुरू झाली आहे. माजी आमदार धनराज महाले यांचा वाढदिवस नुकताच दिंडोरीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, यावेळी शुभेच्छा देणार्‍यांच्या रांगेत शिवसेना नेत्यापेक्षा काँग्रस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाऊगर्दी दिसून आली. विशेष म्हणजे बाजार समितीचे उपसभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिलदादा देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात बसून माजी आमदार महाले यांनी शिवसैनिकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार व विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्याशिवाय अन्य कुणी इच्छुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आघाडी झाल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडण्यात येणार असल्याची चर्चा आघाडीच्या गोटातून पसरवली जात आहे. मात्र, दिवंगत माझी खासदार हरिभाऊ महाले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत राहिलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहता माजी आमदार धनराज महाले यांनी मनावर घेतले तर त्यांना झेंडा बदलून दिल्ली सर करणे फार अवघड जाईल, असे वाटत नाही. त्या कामी तालुक्यातील शिवसेना पक्षांतर्गत एक गट सक्रिय झाला असून, आजवर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते श्रीराम शेटे यांना असलेला विरोध म्हणून शिवसेनेला साथ देणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते अ‍ॅड. बाजीराव कावळे, अ‍ॅड. विलास निरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जाधव, कादवाचे माजी संचालक संपतराव घडवजे आदी स्थानिक पातळीवरील मातब्बर नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यात स्थानिक पातळीवर आमदार झिरवाळ यांचे व महाले यांचे नातेसंबंध पाहता तेही आपल्या मार्गात असलेला एक अडथळा दूर होणार असेल तर पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडे आपला शब्द टाकून महाले यांना चाल देण्याची शक्यता जास्त आहे. या सर्व संभाव्य घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून असलेले दुसरे माजी आमदार रामदास चारोस्कर सध्या आपले पत्ते खुले करण्याच्या मनःस्थितीत नाही, असे असले तरी तेही विधानसभेसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांना भाजपाने पायघड्या टाकून ठेवलेल्या असल्या तरी शिवसेनेला पसंती देण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे गेली दोन पंचवार्षिक भरवशावर असलेले शिवसेना नेते जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.सर्वच पक्षात सुरू असलेल्या हालचाली पाहता निवडणुकीपूर्वी तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहे.