Wed, Jul 08, 2020 20:39होमपेज › Nashik › पोलिसांचे निर्भया पथक वापरणार ‘स्पाय कॅमेरे’ 

पोलिसांचे निर्भया पथक वापरणार ‘स्पाय कॅमेरे’ 

Published On: Jul 09 2019 1:18AM | Last Updated: Jul 09 2019 12:01AM
नाशिक : प्रतिनिधी 

तरुणी, महिलांची छेड काढणार्‍या टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी नेमलेले निर्भया पथक आता स्पाय कॅमेरे वापरणार आहेत. जेणे करून टवाळखोरांनाही संशय येणार नाही, तसेच कायदेशीर पुराव्यांसाठी महत्वाचे ठरेल असा विश्‍वास पोलीस प्रशासनाने वर्तवला आहे. 

निर्भया पथकामुळे शाळा-महाविद्यालयासमोर टवाळखोरी करणारे, छेडछाड करणार्‍यांनी चांगलाच धसका घेतला आहे. पोलीस वाहन नसले तरी टवाळखोरांना निर्भया पथकाची भीती भरण्यात पोलिसांना यश आले आहे. पहाटे 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत या पथकांमार्फत निर्भया पथक गस्त मारत आहेत. टवाळखोरांचे पुरावे कैद करण्यासाठी सध्या पोलीस मोबाइलचा वापर करीत आहेत. मात्र, आता 8 स्पाय कॅमेर्‍यांचा वापर निर्भया पथकातील अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे टवाळखोरांसह इतर नागरिकांना निर्भया पथकाची भणक लागणार नाही असा प्रयत्न केला जात आहे. 

पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा शाखेअंतर्गत निर्भया पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला सुरक्षा शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिंनींना सुरक्षात्मक उपाययोजनांसह लैंगिक अत्याचार, टवाळखोर बचावासाठीचे जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. मागील आठवड्यात सिडकोतील संभाजी क्रीडा संकुलात टवाळखोरांना निर्भया पथकाने चांगलाच धडा शिकवला आहे. महाविद्यालयीन परिसरात साध्या वेशात निर्भया पथक गस्त घालून टवाळखोरांवर कारवाई करीत आहेत. त्यामुळे आता निर्भयाचे वाहन दिसताच टवाळखोर धूम ठोकतानाचे चित्र आहे.