चांदवड : वार्ताहर
मालेगाव तालुक्यातील माणके येथून नाशिक तालुक्यात ऊस तोडणीसाठी जात असलेल्या मजुरांची पिकअप उलटून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले. ही घटना चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे मुंबई-आग्रा महामार्गावर घडली. जखमींना वडाळीभोई येथील आरोग्य केंद्र आणि चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालेगाव तालुक्यातील माणके येथील मजूर बुधवारी (दि.10) नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे येथे ऊस तोडणीसाठी पिकअप गाडी (एमएच 45, 4314) मधून जात असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे मुंबई- आग्रा महामार्गाने नाशिककडे जात होते. त्यावेळी म्हसोबा पेट्रोलपंपासमोर गाडीचालक वामन शांताराम पवार (रा. हिंगणवेढे) याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली गाडी महामार्गावर उलटली. या अपघातात पिकअपमधील सोपान भीमराव सोनवणे (23), सोमनाथ सखाराम ठाकरे (25), विशाल बाळू सोनवणे (19), दीपक मच्छिंद्र पवार (19), परशुराम सखाराम ठाकरे (23), खंडू मच्छिंद्र पवार (20), बाळू सोमनाथ सोनवणे (28), किरण सुभाष सोनवणे (24), मगन विक्रम सोनवणे, देवीदास श्याम पवार, सोमा संपत सोनवणे, देवा दिलीप पवार, समा रतन सोनवणे, गणेश दिलीप मोरे, ज्ञानेश्वर विक्रम सोनवणे, दादा विक्रम सोनवणे, दादा जिभाऊ वाघ, गोविंदा भगवान पवार, जयराम वाघ, गाडीचालक वामन शांताराम पवार, आदी मजूर जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले तर आठ जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या घटने संदर्भात सोपान भीमराव सोनवणे यांनी पिकअपचालक वामन शांताराम पवार याने गाडी चालविताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसांत चालक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.