Fri, Nov 27, 2020 22:38होमपेज › Nashik › चांदवडला मोठा शस्त्रसाठा जप्त

चांदवडला मोठा शस्त्रसाठा जप्त

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 16 2017 12:04AM

बुकमार्क करा

पंचवटी / चांदवड : 
देवानंद बैरागी / सुनील थोरे

मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल नाक्यावर गुरुवारी (दि.14) रात्री बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 22 रायफल्स, 19 पिस्तुले आणि जवळपास चार हजार काडतुसे जप्त केली. या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 13 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चांदवड : वार्ताहर

एका बोलेरो जीपमधून मुंबईकडे निघालेला प्रचंड मोठा शस्त्रसाठा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मंगरूळ टोल नाक्यावर गुरुवारी रात्री पकडला गेल्याने सुरक्षा यंत्रणा हादरून गेल्या आहेत. देशातील कुठल्याही एका पोलीस ठाण्यात नसतो एवढा प्रचंड शस्त्रसाठा या संशयितांकडे कुठून आणि कसा आला, याबाबत पोलीस यंत्रणा संभ्रमात पडली आहे.  हा शस्त्रसाठा घेऊन निघालेल्या तिघाही आरोपींना चांदवड न्यायालयात न्यायाधीश के. जी. चौधरी यांनी त्यांना 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा शस्त्रसाठा कोण आणि कुणासाठी पाठवत होते याबद्दलचे गुढ कायम आहे. बोलेरो गाडीला आतून बाहेरून तपासले तरी कुठेही शस्त्रे दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्यात आली होती. गाडीच्या टपाला चोरकप्पा तयार करून त्यात ही शस्त्रास्त्रे ठेवण्यात आली होती. जप्त झालेल्या शस्त्रसाठ्यात 22 लहान-मोठ्या रायफल्स, एक पंप अ‍ॅक्शन मशीनगन, 19 रिव्हॉल्व्हर्स अशी एकूण 42 अग्निशस्त्रे व त्यासाठी लागणारा वेगवेगळा दारूगोळा, चार हजार 140 जिवंत काडतुसांचा समावेश आहे. 
मालेगावच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके फाट्याजवळ साई सुमन पेट्रोलपंपावर संशयितांनी बोलेरो गाडीत 2700 रुपयांचेे डिझेल भरले. मात्र, पैसे न देताच त्यांनी चांदवडकडे पळ काढला.  पंपचालक आहिरे यांनी मालेगाव पोलीस ठाण्याला सतर्क केले. पोलिसांनी सगळीकडे वायरलेसवरून यंत्रणा दक्ष केली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, उपनिरीक्षक कैलास चौधरी, हवालदार हरिश्‍चंद्र पालवी, उत्तम गोसावी यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ टोल नाक्यावर सापळा रचला. आणि सिल्व्हर रंगाची बोलेरो गाडी (एमएच 01 एसए 7460) या सापळ्यात अलगद आली. तिन्ही संशयितांनी हुक्का प्यायल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांना बोलेरो गाडीत हुक्कापात्र व हुक्क्याची नळी, तसेच एक गॅस गनदेखील आढळून आली.गाडीत लोखंडी कटवणी, लोखंडी पान्हे, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला.

गाडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (27, रा. शिवडी. मुंबई), सलमान अमानुल्ला खान (19, शिवडी मच्छी गोदाम, मुंबई), नागेश राजेंद्र बनसोडे (23, रा. वडाळा, मुंबई) यांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तेवढ्यात एका संशयिताच्या शर्टमधून एक पिस्तूल खाली पडले आणि पोलिसांचा संशय बळावला. गाडीची झडती घेतली असता, गाडीच्या छताला चोरकप्पा दिसला आणि प्रचंड शस्त्रसाठा हाती लागला. वरिष्ठ पोलिसांनी चांदवडला रात्रभर ठाण मांडून संशयितांची कसून चौकशी केली. मात्र या शस्त्रसाठ्याचे गुढ काही उकलले नाही.