Wed, Jun 03, 2020 09:10होमपेज › Nashik › उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा : निवडणूक आयोगाचा फतवा

उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरावा : निवडणूक आयोगाचा फतवा

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:34AMनाशिक : प्रतिनिधी

राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा फतवा राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसह जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. 

मार्च ते मे याकाळात राज्यभरातील मुदत संपणार्‍या तसेच रिक्त असलेल्या  ग्रामपंचायतींमध्ये 25 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या निवडणूकांसाठी सोमवारपासून (दि. 5) अर्ज दाखल करता येणार आहे. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. जिल्ह्यातील 278 ग्रामपंचायतींमधील 493 रिक्त पदाचा समावेश आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना ते ऑनलाइन पद्धतीनेच भरण्याचा जुना सुर निवडणुक आयोगाने आळवला आहे. तसे आदेशच जिल्हा प्रशासनांना तीन दिवसांपूर्वी देण्यात आले आहेत. ऐनवेळी ऑनलाइन अर्जाबाबत आयोगाने घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनाची धांदल ऊडाली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या आखाड्यात ऊतरलेल्या उमेदवारांंसाठी हा एक धक्काच मानला जात आहे. कारण ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धती क्लिष्ट असून त्यात बराच कालावधी खर्ची पडतो. परिणामी अर्ज भरायचा की प्रचार करायचा अशा दुहेरी कोंडीत उमेदवार सापडले आहेत.

निवडणूक आयोगाने वर्षभरापुर्वी राज्याभरातील ग्रामपंचायत निवडणूकांवेळी ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रयोग केला होता. मात्र, गावांमधील नेटवर्कची समस्या, उमेदवारांमधील आनलाईन अर्जाबाबतचे अज्ञान तसेच इतर तांत्रिक कारणास्तव हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयोगावर आली होती. त्यावेळी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर पारंपारिक पद्धतीने अर्ज भरून घेण्याचे निर्देश आयोगाने दिले होते. हा अनुभव गाठीशी असतानादेखील यंदाच्या निवडणुकांमध्ये ऑनलाईन उमेदवारी अर्जाची जुनीच री आयोगाने खेचली आहे. त्यामुळे हा प्रयोग किती यशस्वी ठरतो हे 10 फेब्रुवारीपर्यंत स्पष्ठ होईल.

प्रशासनाने तयार केली मानसिकता

ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचा फतवा ऐनवेळेस आल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने तयारी केली आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहे. मात्र, मागील अनुभव गाठीशी असल्याने पारंपारिक अर्ज स्वीकारण्याची मानसिकता प्रशासनाने तयार केली आहे. आयोगाकडून ऐनवेळेस पारंपारिक अर्ज भरून घेण्याच्या सूचना आल्यास त्या पद्धतीने अर्ज घेण्याची प्रशासनाची तयारी आहे.