Wed, Jan 27, 2021 10:30होमपेज › Nashik › देशात कांदा फक्त कसमादेतच !

देशात कांदा फक्त कसमादेतच !

Published On: Sep 26 2019 2:25AM | Last Updated: Sep 25 2019 11:36PM
सटाणा : सुरेश बच्छाव
संपूर्ण देशभरात कांद्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याची हानी झाल्याने गेल्या सहा ते सात महिन्यांपासून साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची मागणी वाढली. सद्यस्थितीत हा कांदा महाराष्ट्रातच आणि तोही विशेषत्वाने बागलाण, कळवण आणि देवळा तालुक्यातच आहे. त्यामुळे हा परिसर देशाची कांद्याची गरज पूर्ण करत आहे. परंतु चढ्या दराच्या निमित्ताने त्याच उत्पादकांविरोधात ग्राहकवर्गाकडून नाराजी व्यक्त होते. 

प्रत्यक्षात मात्र एवढ्या कालखंडात एकूण उत्पन्नापैकी निम्मा माल खराब झाल्याने मिळणार्‍या या बाजारभावातून शेतकर्‍यांच्या पदरात केवळ निम्मेच पैसे येत आहेत. त्याअर्थी सद्यस्थितीत सरासरी तीन हजार रुपये मिळणार्‍या भावाचा विचार करता शेतकर्‍यांना तो कांदा अवघा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल पडत आहे. तेच 25 ते 30 रुपये प्रति किलोप्रमाणे घेतलेला कांदा ग्राहकांकडे 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोच करणार्‍या मधल्या यंत्रणेबाबत मात्र कोणीही ब्र काढत नसल्याने परिसरातून सखेद आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. खास बाब म्हणजे सटाणा, कळवण आणि देवळा परिसरातही केवळ दहा टक्के कांदा शिल्लक असून एवढ्या पंधरवड्यात तोही संपल्यानंतर मात्र अक्षरशः ग्राहकांना कांदा मिळणेच मुश्कील होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

अशी अभूतपूर्व परिस्थिती केवळ आणि केवळ अतिवृष्टीमुळे नवीन मालाची हानी झाल्यामुळे उद्भवली आहे. अन्यथा, गेल्या काही वर्षांपासून हाच ठेवलेला कांदा याच दिवसात हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल विकावा लागला आहे. 

कांदा फक्त कसमादेमध्येच!

नवीन कांदा कुठेच नसताना महाराष्ट्रातील कळवण, सटाणा, देवळा आणि मालेगावच्या काही भागात फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्पादन घेतलेला उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहेे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवड करून फेब्रुवारी - मार्चमध्ये उत्पादन घेतल्यानंतर हा कांदा तब्बल सहा-सात महिने साठवून ठेवला जातो. खास बाब म्हणजे याच परिसरात उत्पादित केलेला कांदाच आणि याच भागात एवढा प्रदीर्घ काळ टिकाव धरू शकतो. उरलेल्या कांद्याला मिळणारा बाजारभाव चांगला असला तरच ही साठवणूक फायदेशीर ठरते. एकूण उत्पादनापैकी निम्मी उत्पादन खराब झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर उरलेल्या उत्पादनाचा बाजारभाव हा प्रत्यक्षात निम्मीच ठरतो. त्यानुसार सद्यस्थितीत मिळणारा सरासरी तीन हजाराचा दर पाहता एकूण उत्पादनाचा हिशोब करता उत्पादकांच्या पदरी प्रति क्विंटल पंधराशे रुपये हाच दर मिळतो. या वस्तुस्थितीकडे मात्र सगळ्यांकडूनच डोळेझाक होताना दिसते. कांदा ग्राहकांच्या हातात पोहोचेपर्यंत 60 ते 70 रुपये किलो का ? आणि कसा होतो? याबाबत मात्र कुणीही गांभीर्याने  पाहत नसल्याच्या भावना शेतकर्‍यांंकडून व्यक्त होत आहेत.

असा खराब होतो कांदा?

शेतातून उत्पादन केलेल्या कांद्यापैकी चांगल्या निवडक कांद्याची साठवणूक केली जाते.  त्यामुळे शेतातून चाळीपर्यंत येतानाच 20टक्के माल सोडून द्यावा लागतो. चाळीत भरताना (अतिरिक्त खर्च करून) किमान पाच ते दहा टक्के मालाची साल खराब होते. चाळीत माल ठेवल्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर तो बाजारात येण्यास सुरुवात होते. तोपर्यंत वजन 10 ते 15 टक्क्यांनी घटते. शिवाय यादरम्यान किमान 20 टक्के माल हमखास खराब होतो. एप्रिल-मेमधील विक्रमी उष्मा, जूनमधील पावसाळापूर्व वातावरणामुळे पाच टक्क्यांहून अधिक कांदा सडतो तर तेवढ्याच कांद्याला कोंब येऊन जातात. अर्थातच साठवणुकीचा कालावधी वाढत जाताना खराब मालाचे प्रमाणही वाढते. सप्टेंबरमध्ये निम्मा माल विक्रीयोग्य निवडताना तितकाच कांदा थेट उकिरड्यावर फेकावा लागतो.