सिडको : प्रतिनिधी
उंटवाडी परिसरात सिटी सेंटर मॉलजवळच्या मुथूट फायनान्स कार्यालयात दरोडेखोरांनी शुक्रवारी (दि.14) दरोडा टाकून रोकड व सोने लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न फसल्यानंतर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचार्याचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवर्स इमारतीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीत सोनेतारण ठेवून कर्ज देण्याचा व्यवहार केला जातो. या ठिकाणी शुक्रवारी (दि.14) सकाळी 11च्या दरम्यान कार्यालयात नियमित कामकाज सुरू होते. यावेळी काही ग्राहक उपस्थित होते. त्या दरम्यान पाच दरोडेखोर बँकेच्या कार्यालयात शिरले व त्यांनी बंदुकीचा आपल्याजवळील शस्त्रांचा धाक दाखवत ग्राहक व कर्मचार्यांकडील मोबाइल काढून घेतले. त्यानंतर सर्वांना एका बाजूला उभे केले.
दरम्यान, घडत असलेला प्रकार लक्षात आल्याने कार्यालयात केरळ येथून आलेले आयटी इंजिनिअर व ऑडिटर कैलास जयन हे मॅनेजर यांच्या केबीनमध्ये होते. यावेळी शाजू सॅम्युअल यांनी धोक्याची सूचना देणारा भोंगा वाजवल्याने संतप्त झालेल्या दरोडेखोरांनी सॅम्युअल यांना मॅनेजरच्या केबीनमधून बाहेर काढले. सॅम्युअल हे विरोध करत असताना एकाने त्यांच्यावर गोळीबार केला, तरी सॅम्युअल यांनी विरोध करणे सुरूच ठेवले. त्यानंतर दोन ते तीन जणांनी सॅम्युअलवर पुन्हा गोळीबार केला. या घटनेत सॅम्युअल यांना तीन ते चार गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दरोडेखोरांनी व्यवस्थापक देशपांडे यांच्याकडे चावीची मागणी केली. परंतु त्यांनी चावी दिली नाही. याचवेळी दरोडेखोरांतील एक जण बाहेर गेला व परत प्रवेशद्वारावर आला व साथीदारांना मराठी भाषेत पळा आता असे सांगितले. दरोडा अयशस्वी झाल्याने दरोडेखोर फरार झाले. यावेळी त्यांनी अन्य कर्मचार्यांवरही गोळीबार केला. तसेच, जाताना व्यवस्थापकासह एकाच्या डोक्यात बंदुकीची बट तर व्यवस्थापकाच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये चंद्रशेखर देशपांडे, कैलास जयन जखमी झाले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण जिल्हाभर नाकाबंदी केली आहे. तसेच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या समवेत आयुक्तालय हद्दीतील सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदर सीमा हिरे व सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपींच्या शोधार्थ नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, सात दरोडेखोरांपैकी पाच दरोडेखोर फायनान्स कार्यालयात शिरले होते. तर दोघे खालीच थांबलेले होते. घटनेनंतर सातही दरोडेखोर तीन दुचाकीवर फरार झाल्याचे चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांच्या शोधासाठी पंधरा पथकांची निर्मिती : मुथूट फायनान्सवर दरोडा प्रकरणातील संशयितांचे रेखाचित्र पोलिसांकडून तयार करण्यात आले आहे. फायनान्स कार्यालयासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलीस प्रशासनाकडून 15 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक राज्यातील विविध ठिकाणी रवाना झाले आहे. त्यामुळे लवकरच संशयित हाती लागतील असा
विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लूट झाली नसल्याचे सांगितले.