Tue, May 26, 2020 13:09होमपेज › Nashik › पिस्तूल दाखवून धमकावणार्‍या 'त्या' महिलेसह ९ जणांना अटक 

नंदुरबार : पिस्तूल दाखवून धमकावणार्‍या 'त्या' महिलेसह ९ जणांना अटक 

Published On: Aug 24 2019 5:02PM | Last Updated: Aug 24 2019 5:02PM

संग्रहित छायाचित्रनंदुरबार : प्रतिनिधी 

येथील बसस्थानक आवारात आज (ता.२४) पहाटे एका महिलेने सहकारी आणून मजुरांच्या सहाय्याने परिवहन मंडळाच्या मालकीची वादग्रस्त भिंत पाडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेसह ९ जणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे २ पिस्तूल, एक मॅगझीन आणि २५ जिवंत काडतूसे आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आपण खासदार असल्याचे सांगणार्‍या या महिलेची कसून चौकशी सुरु आहे.

बबिता वर्मा (रा.अंधेरी), विजय किसन देवरे (रा. खोरदड, जि.धुळे), अजित चंद्रकांत देसले (रा.वलवाडी, धुळे), वाल्मिक श्रीधर दराडे (रा. तिडके कॉलनी, नाशिक) यांच्यासह जंगलु पाडवी, प्रकाश पाडवी, दादू भिल, जयू भिल, रवींद्र पाडवी (सर्व रा. नलवा, ता. नंदुरबार) या ५ मजुरांना अटक करण्यात आली आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदुरबार बसस्थानका शेजारी साईप्लाझा कॉम्प्लेक्स बांधण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या मालकीची जागा आणि या कॉम्प्लेक्सचे झालेले बांधकाम यावरून कॉम्प्लेक्स मालक रमेश चौधरी यांच्याशी परिवहन मंडळाचा काही वर्षांपासून वाद आहे. तथापी कॉम्प्लेक्सला लागून परिवहन मंडळाने आपल्या मालकीच्या जागेत भिंत बांधलेली आहे. आज, पहाटेच्या सुमारास एक महिला काही मजूर लावून ती भिंत पाडत असल्याचे परिवहन मंडळाचे एक अधिकारी मनोज पवार यांना आढळून आले. यावेळी पवार यांनी त्यांना रोखले असता संबंधित महिलेने आपण खासदार आहोत, असे सांगून पवार यांना धमकावत निघून जाण्यास सांगितले. तर, भिंत काढून टाकण्याचा आपल्याकडे आदेश असल्याचा दावा करीत तिने बनावट कागदपत्र देखील दाखविले. 

पवार यांनी यासंबंधी अधिक विचारणा केली तेव्हा त्या महिलेच्या सोबत असलेल्या तिघांनी पवार यांना धक्काबुक्की केली. इतकेच नाही तर आपण पोलिस असल्याचे सांगत थेट पिस्तूल दाखवून धमकी दिली. महिलेने देखील पिस्तूल काढून धमकावले. पवारांनी थेट वरिष्ठ अधिकार्‍यांना याची माहिती देवून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धावून घेतली. यावेळी या महिलेस संबंधितांनी पोलिसांशीही हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती बाहेर आली. कॉम्प्लेक्स मालकाने भिंत काढण्याच्या कामासाठी रोख ५ लाख रूपये दिले म्हणून आम्ही अंधेरी(मुंबई) येथून आलो असल्याची कबूली संबंधित महिलेने दिली. मुंबईतून आलेली ही महिला नेमकी कोण आहे? याचा तपास पोलिस करीत आहेत.