होमपेज › Nashik › रजनीकांतसुध्दा मोदींना घाबरला असेल : उध्दव ठाकरे

रजनीकांतसुध्दा मोदींना घाबरला असेल : उध्दव ठाकरे

Published On: May 06 2018 2:59PM | Last Updated: May 06 2018 3:00PMनाशिक : प्रतिनिधी 

नाणार प्रकल्पाचा विषय शिवसेनेसाठी संपला असून हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा. देशात अनेक ठिकाणी जेथे समुद्र नाही तेथे सुद्धा तेल रिफायनरी आहेत. मुख्यमंत्री म्हणतात विदर्भात समुद्र नाही, त्यांनी हे मोदींना सांगावे ते विदर्भात सुध्दा समुद्र आणतील, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लगावला. आता रजनीकांत सुध्दा मोदींना घाबरतो, अशी मिश्कील टिप्पणी देखील त्यांनी केली.

उत्तर महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाचा आढवा घेण्यासाठी ठाकरे रविवारी (दि.6) नाशिक दौर्‍यावर आले होते. त्यावेळी पत्रकार परिदषदेत ते बोलत होते. शिवसेनेने नाणार प्रकल्प जमीन अधिग्रहणची अधिसूचना रद्द केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय संपवला आहे. 

हा प्रकल्प विदर्भात घेऊन जा. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या पोकळ गप्पा मारण्याऐवजी ठोस योजना राबवाव्या, असा सल्ला त्यांनी दिला. भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी माझी भेट घेऊन हा प्रकल्प विदर्भात होऊ शकतो, हे अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. देशमुख यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा माझ्यावर अधिक विश्‍वास वाटतो असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आमदारांची एकदा शाळा घ्यावी, अशी टीका त्यांनी केली. 

तसेच, आघाडी झाली म्हणून शिवसेना युती करेल असे होणार नाही. दोन्ही काँग्रेसचे मन किती जुळले हे माहीत नाही पण ‘लकवा’ मारलेले दोन्ही हात एकत्र आले, या शब्दात त्यांनी आघाडीचा समाचार घेतला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्वबळाचा ठराव झाला आहे. हे सांगत शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावरच लढवेल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी सेना नेते संजय राऊत, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, राज्य ग्रामविकास मंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

Tags : nashik, uddhav thackeray, press conference, nanar project, cm devendra fadanavis, Pm modi