Mon, Aug 03, 2020 14:44होमपेज › Nashik › नाशिकमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

नाशिकमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

Published On: Jan 18 2018 8:58PM | Last Updated: Jan 18 2018 9:07PMपंचवटी : वार्ताहर 

पंचवटी परिसरातील श्री काळाराम मंदिराला गुरुवारी (दि.18) दुपारी बारा वाजता मंदिरातून गोळीबार होण्याचा आवाज भाविकांच्या कानावर पडला.  सर्वत्र भीतीचे वातावरण असताना एक कमांडो खांद्यावर एका अतिरेक्यांचे शव घेऊन बाहेर आल्यानंतर सर्वांनी एकच नि:श्‍वास सोडला.      

दहशतवादी आणि अतिरेकी कारवाया लक्षात घेता या पार्श्‍वभूमीवर नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीने पंचवटी परिसरातील काळाराम मंदिरात मॉक ड्रिल राबविण्यात आले. यामध्ये अतिरेक्यांनी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामचंद्राच्या काळाराम मंदिरावर हल्ला चढवून भाविकांना ओलिस ठेवले. घटनेची माहिती कळताच पोलीस दलातील विशेष कमांडोंनी काळाराम मंदिराला घेराव घातला.

सर्व बाजूंनी मंदिराला वेढा देत काही कमांडोनी मंदिरात प्रवेश करीत अतिरेक्यांच्या तावडीत असलेल्या भाविकांची सुखरूप सुटका करत तिघांना कंठस्नान घातले. थोड्या वेळाने हा हल्ला खराखुरा नसून पोलिसांच्या सरावाचा एक भाग असल्याचे समजल्यानंतर उपस्थित सर्वांनी नि:श्‍वास सोडला. कमांडो पथकाने तासाभराच्या कारवाईत तिन्ही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मंदिरात ठेवलेला बॉम्ब निकामी केला. अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रांसह बॉम्बही असल्याने कमांडोंच्या पथकाने कारवाई करताना सबुरीने घेत बॉम्ब ठेवलेल्या जागेजवळ भाविकांना जाण्यास मज्जाव केला. 

सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)अशोक नखाते, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली 50 च्यावर कमांडोंनी या मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला.

नाशिकरोड : आयएसपी प्रेसमध्ये दहशत

येथील आयएसपी प्रेसमधील कर्मचारी सायंकाळच्या सुमारास प्रेसबाहेर पडण्याच्या तयारीत असताना अचानक पांढर्‍या रंगाच्या कारमधून तीन अतिरेकी आत प्रवेश करतात. कर्मचार्‍यांवर बंदूक रोखून हल्‍ला करण्याच्या आतच प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक या दहशतवाद्यांवर हल्‍ला करतात. यात हे तीनही दहशतवादी जमिनीवर कोसळतात.अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रेस कामगार प्रचंड भयभीत झाले, मात्र थोड्याच वेळात सुरक्षा यंत्रणांचा हा सराव असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

अतिरेकी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा यंत्रणेने गुरुवारी सायंकाळी  आयएसपी प्रेस सुटण्याच्या दरम्यान हा सराव केला. यादरम्यान प्रेसवर अतिरेकी हल्ला झाल्याचा संदेश जाणूनबुजून कामगारांमध्ये पसरविण्यात आला. त्यामुळे कामगार वर्गात भीतीचे वातावरण होते.

प्रेसला दहशतवाद्यांचा धोका आहे. भविष्यात अशाप्रसंगी प्रतिकार कसा करावा, याकरिता सराव करण्यात आला. बॉम्ब निकामी पथकासह अतिरेकी विरोधी, जलद प्रतिसाद, श्वान पथक सहभागी झाले होते. सीआयएसफचे डेप्यूटी कमांडट शिवरतनसिंग मिना, वरिष्ठ निरीक्षक एन.एल. चित्ते, व्ही. आर. बिरादर, प्रेसचे महाव्यवस्थापक सुधीर शाहू, उपमहाव्यवस्थापक के. के. मुजुमदार, डी. डी. ढाके, प्रेस मजदूर संघाचे ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच बॉम्ब निकामी पथकाचे बी.आर. शेजाळ, निलकंठ दुसाने, दिनेश देवरे, बॉम्ब शोधणारा डेल्टा हा श्वान आदी उपस्थित होते.