Fri, Sep 18, 2020 18:28होमपेज › Nashik › पोलीस कँटीन नव्या जागेत सुरू 

पोलीस कँटीन नव्या जागेत सुरू 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा होत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पोलीस मुख्यालयातील सद्भावना वस्तू भांडार अर्थात, पोलीस कँटीन आता नव्या जागेत सुरू झाली आहे. मंगळवारी (दि.28) तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात नव्या इमारतीत पोलीस आयुक्तांच्या हस्ते या कँटीनचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना या कँटीनचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. 

पुणे येथील मुख्य कँटीनमधून मालाचा पुरवठा होत नसल्याने राज्यभरातील बहुतांशी पोलीस कँटीन बंद पडल्या असून, नाशिकच्या कँटीनचाही त्यात समावेश होता. ऐन दिवाळीतही पोलीस कुटुंबीयांना बाहेरील बाजारपेठेतून वस्तू खरेदी करावी लागल्याने त्यांना आर्थिक झळ पोहोचल्याने अनेकांनी नाराजी वर्तवली होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध करून पोलिसांच्या प्रश्‍नासंदर्भात वाचा फोडली होती. दरम्यान, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी नवीन इमारतीत महाराष्ट्र पोलीस अकादमीत असलेल्या कँटीनसारखी पोलिसांची कँटीन उभारण्यास प्रयत्न सुरू केले. त्यानुसार सद्भावना वस्तू भांडार नावाने पोलीस कँटीन उभारण्यात आले आहे. डॉ. सिंगल यांच्यासह पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना वस्तू भांडारचे उद्घाटन करण्यात आले. या कँटीनमध्ये पोलिसांसाठी किराणा, इलेक्ट्रॉनिक, खाद्य, कुकर, गॅस, पंखा, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या कँटीनमधून खरेदी केल्याने पोलिसांची एकूण खरेदीच्या 30 टक्क्यांपर्यंतची बचत होऊ शकेल. डॉ. सिंगल यांनीही प्रशंसा करीत कँटीनमुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्‍चितच फायदा होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.