Fri, Jun 05, 2020 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › घरघुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या चौघांना अटक

घरघुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या चौघांना अटक

Published On: Feb 03 2019 5:25PM | Last Updated: Feb 03 2019 4:30PM
पंचवटी : वार्ताहर 

गॅस ग्राहकांना घरगुती सिलेंडर घरी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या आणि पंचवटी परिसरातील भारत गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या चौघा डिलिव्हरी बॉयना आडगाव पोलिसांनी गॅस चोरी करताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरगुती गॅसचे २९ सिलेंडर तसेच ॲपे रिक्षा, इलेक्ट्रिक वजन काटा असा जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी (दि.२) विडीकामगार नगर गंगोत्री विहार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. गॅस चोरी करणारे संशयित आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरातील रहिवासी आहे.

याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, हवालदार मुनीर काझी, विनोद लखन, विजय सूर्यवंशी, वाल्मीक पाटील, नकुल जाधव असे गंगोत्री विहार परिसरात गस्ती घालत असताना रस्त्याच्या कडेला एक पिवळ्या रंगाची ॲपे रिक्षा क्रमांक (एमएच १५ इजी ४७७९) संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, संशयित आरोपी राजेंद्र गजेंद्र उर्फ गजानन मोहिते (वय ४२), गजानन कैलास ढाले (२५), मधुकर तुकाराम कोसे (२४), आनंदा गजेंद्र उर्फ गजानन मोहिते (५०) सर्व राहणार विडीकामगार नगर सावित्रीबाई झोपडपट्टी अमृतधाम हे एका लोखंडी पाईपच्या सहाय्याने भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्‍याचे आढळून आले.

यावेळी पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली त्यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा वस्तू कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांना अटक करण्यात आली आहे.