Fri, Jul 03, 2020 00:11होमपेज › Nashik › जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

Last Updated: May 26 2020 12:46PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काल ( दि. २५ ) उपचार घेणाऱ्या ५४ वर्षीय चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील रहिवासी असलेले चालक काही दिवसांपूर्वी कामगारांना पोहचवण्यासाठी चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेशामध्ये गेले होते. 

उत्तर प्रदेश मधून परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झालेला. परतीच्या प्रवासात १८ मे रोजी चांदवड मध्ये त्यांना ताप, खोकला व श्वसनाचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना चांदवड मधील कोविड हेल्थ सेंटर येथे त्यांनी तपासणीसाठी दाखल केले. तेथे दम लागणे व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी आढळून आले. म्हणून तेथे त्यांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. १९ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. 

त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण तीनशेपेक्षा जास्त होते. एक्सरे मध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना पूर्णवेळ ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू होते. मात्र त्यांचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला.