Tue, May 26, 2020 11:14होमपेज › Nashik › नाशिक महापालिकेत भाजपमध्ये खांदेपालट  

नाशिक महापालिकेत भाजपमध्ये खांदेपालट  

Published On: Jun 28 2019 11:39AM | Last Updated: Jun 28 2019 11:39AM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये मोठी खांदेपालट करण्यात आली असून, गटनेतेपदी जगदीश पाटील तर सभागृह नेतेपदी सतीश सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणूक झाल्यानंतर भाजपने गटनेतेपद संभाजी मोरूस्कर तर सभागृह नेतेपद दिनकर पाटील यांच्याकडे सोपविले होते. आता त्यांच्याकडील अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पाटील व सतीश सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. 

गेल्या तीन ते चार महिन्यांपासूनच अशा प्रकारची खांदेपालट करण्याची तयारी सुरू होती. तशा प्रकारची कल्पनाही पाटील व सोनवणे यांना यापूर्वीच देण्यात आली होती. मात्र घोषणा करण्यात आली नव्हती. या खांदेपालटमुळे मोरूस्कर आणि पाटील यांना पक्षाकडून धक्का देण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून दिनकर पाटील हे धार्मिक स्थळ, मनपाच्या मिळकती, माध्यान्ह भोजन योजन आणि सिडकोतील बांधकाम परवानगी या विषयांसाठी सभागृहातच ठिय्या मांडून बसले आहेत. पक्षात राहून पक्षाला घरचा आहेर देण्यात आल्याने पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अडचणीत सापडले होते. पाटील यांच्यामुळे कोंडी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण झाले होते. ही सर्व पार्श्वभूमी पाहता पक्षाने तत्काळ निर्णय घेत पाटील यांच्याकडून सभागृह नेतेपद काढून घेत ते मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले नगरसेवक सतिश सोनवणे यांना सोपविले आहे. मोरूस्कर यांचे गटनेतेपद जगदीश पाटील यांना देण्यात आले आहे. 

यासंदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोनवणे व पाटील यांना गुरूवारी (दि.27) मुंबई येथे बोलावून घेत तिथे खांदेपालटाविषयीची माहिती दिली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, नगरसेवक शाम बडोदे, चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे आदी उपस्थित होते.