नाशिक : प्रतिनिधी
खासगी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून महापालिका शाळेतील सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. 31) शहरात घडली. विद्यार्थी वर्गातून लघुशंकेसाठी बाहेर आल्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी वर्गशिक्षिका व संबंधित घरमालक महिलेवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय पंडित साठे (7, रा. संत कबीरनगर) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. तो सातपूरच्या संत कबीरनगर परिसरातील मनपा शाळा क्रमांक 16 मध्ये इयत्ता पहिलीत शिकत होता. अक्षयला त्याच्या वडिलांनी सकाळी 8 वाजता शाळेत सोडले. मात्र, 10 वाजता अक्षय घरी न आल्याने त्याला पाहण्यासाठी पालक शाळेत गेले तेव्हा हा प्रकार उघड झाला. पालकांनी शाळेत वर्गशिक्षिकेकडे अक्षयबाबत चौकशी केली, तेव्हा ‘9 वाजता अक्षय लघुशंकेसाठी वर्गाबाहेर गेला तो अद्याप आलेला नाही’, असे शिक्षिकेने सांगितले. त्यावर पालकांनी स्वच्छतागृहांची पाहणी करीत आजूबाजूला राहणार्या नातलगांकडे विचारपूस केली. मात्र, अक्षयचा शोध लागला नाही. या परिसरात संगीता वाघमारे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी त्यांनी पाया खोदला असून, तेथे 5 ते 7 फूट खोल खड्डे आहेत. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. खड्ड्यांमधील पाणी काढण्यासाठी कामगार खड्ड्यात उतरला असता, त्याला अक्षयचा मृतदेह आढळून आला. ही बातमी वार्यासारखी पसरताच खळबळ उडाली. पालकांनी अक्षयला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अक्षयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. तेथे अक्षयच्या नातलगांचा विरह हृदय पिळवटून टाकणारा होता. नातलगांनी मनपा शालेय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्षयचा जीव गेल्याचा आरोप केला. अक्षयवर लक्ष न ठेवल्याने त्याचा मृत्यू झाला असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. घटनेनंतर मनपा शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी शाळेत जाऊन माहिती घेतली.
मंगळवारी (दि.30) मविप्र समाजाच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये कपाट अंगावर पडल्याने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ दुसर्या दिवशी शहरातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.वर्गशिक्षिका व घरमालकावर गुन्हा दाखल अक्षयला वर्गाबाहेर सोडणार्या वर्गशिक्षिकेस ताब्यात घ्यावे व संबंधितावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अक्षयच्या नातलगांनी केली. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातलगांनी घेतला होता. अखेर सायंकाळी गंगापूर पोलीस ठाण्यात अक्षयच्या वर्गशिक्षिका मंदा बागूल यांच्यासह घराचा पाया खोदणार्या घरमालक संगीता वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही निष्काळजीपणा केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला. त्यानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला.
वाढदिवसापूर्वीच झडप
अक्षयचे वडील मोलमजुरी करतात. येत्या शुक्रवारी (दि.2) अक्षयचा वाढदिवस साजरा केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अक्षयच्या पश्चात दोन लहान भाऊ, आई, वडील, आजी असा परिवार आहे.