Wed, Feb 26, 2020 02:31होमपेज › Nashik › नाशिकमध्ये भुजबळांना जबर हादरा

नाशिकमध्ये भुजबळांना जबर हादरा

Published On: Jun 02 2019 1:57AM | Last Updated: Jun 02 2019 1:57AM
ज्ञानेश्‍वर वाघ

नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्वार्थाने गाजली. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांचा पराभव करून विजयी झालेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी स्वत:चेच विक्रम मोडीत काढले. सुमारे चाळीस वर्षांनंतर नाशिकला खासदार रिपिट होण्याचा इतिहास गिरवला गेला. आपले धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व सावरू पाहणार्‍या भुजबळांना गोडसेंनी दोन वेळा जबर धक्का दिल्याने भुजबळ यांना मोठाच हादरा बसला आहे. त्याचबरोबर चौरंगी लढतीतील अपक्ष उमेदवार माणिक कोकाटे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार या दोन्ही उमेदवारांनी एक लाखांचा टप्पा गाठून ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी भुजबळांचा एक लाख 87 हजार 333 इतक्या मतांनी दारुण पराभव केला होता. खरे तर तेव्हाच भुजबळांना धोक्याची घंटा ऐकू यायला हवी होती. मात्र त्यांच्या भोवती असलेल्यांनी तिथपर्यंत त्यांना पोहोचूच दिले नाही. 2014 मधील पराभवानंतर समीर आणि छगन भुजबळांना अटक झाली आणि त्यांना जवळपास दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. भुजबळांना या प्रकरणात नाहक गोवल्याची भावना त्यावेळी अनेकांच्या मनात निर्माण झाल्याने भुजबळांविषयी खरोखरच सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. मात्र ती टिकविण्यात ते अपयशी ठरले. 2019 मधील निवडणुकीत भुजबळांचा इतका दारुण पराभव होईल हे कुणाच्याच गावी नसावे. 

काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीमधीलही अनेकांनी भुजबळ फार्मवर पाय ठेवला. मात्र त्याची पायरी चढताना अनेकदा विचार केला असावा. अपक्ष उमेदवार माजी आमदार माणिक कोकाटे हे भुजबळांनी उभे केलेले उमेदवार अशी चर्चा निवडणुकीत होती. हा धब्बा पुसून काढण्यात कोकाटेंना यश आले नाही. यामुळे त्यांना केवळ आपल्या कर्मभूमीत पडलेल्या मतांवरच समाधान मानावे लागले. कोकाटे हे सव्वा ते दीड लाख मतांचे धनी असतील, अशी चर्चा त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते मतमोजणीपर्यंत सुरू होती आणि ती सार्थ ठरली. कारण सिन्नरमधून त्यांना मताधिक्य मिळेल हे सर्वच जण जाणून होते. याच सिन्नर आणि इगतपुरीतून चांगली मते मिळतील, अशी आशा भुजबळांना होती. मात्र तिथेही त्यांना गोडसे यांनी पिछाडीवर टाकत सर्वच विधानसभा मतदारसंघांत आपला डंका कायम ठेवला.

खरे तर कोकाटेंमुळे मोठ्या प्रमाणावर मत विभागणी होऊन हेमंत गोडसे यांना मोठा फटका बसेल, अशी चिंता गोडसे यांच्यासह युतीच्या श्रेष्ठींनाही होती. परंतु, हे सर्व फोल ठरले. युतीतील शिवसेना आणि भाजपने निवडणुकीत प्रामाणिकपणे केलेले कार्य हे यशाचे गमक म्हणता येईल. बूथस्तरावरील कामगिरी दोन्ही पक्षांची सरस ठरली. त्याच्या आसपासही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पोहोचता आले नाही. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करायचे या ईर्ष्येने युतीचे कार्यकर्ते जसे पेटून उठले होते तसे मतदारही उघड उघडपणे नाही, परंतु मतदान करताना हाच विचार करून मतदान करत होते. म्हणजेच 2014 प्रमाणे अगदी उघडपणे नाही; मात्र मोदी लाटेचा अंडरकरंट नक्कीच गोडसेंच्या पथ्यावर पडला हे मान्यच करायला हवे. जाहीर सभांच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह युतीच्या नेत्यांनी परतवून लावले. मत कुणाला देणार, तुरुंगाची वारी करून आलेल्यांना की स्वच्छ प्रतिमा असलेल्या गोडसेंना ही सादही बर्‍याचअंशी परिणामकारक ठरली. 24 एप्रिलला उद्धव ठाकरे यांची झालेली जाहीर सभा आणि त्यानंतर 26 एप्रिलला सकाळच्या सत्रात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेने देखील गोडसेंचे पारडे जड झाले. 

दुसरीकडे महाराष्ट्र सदनासह काही कथित घोटाळ्यांचे आरोप असलेले माजी मंत्री छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांच्याविषयी नाशिकमधून एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. ती लाट शेवटपर्यंत भुजबळांच्या मनगटात जोर पकडून ठेवू शकली नाही.