Wed, Jun 03, 2020 21:51होमपेज › Nashik › राजकीय भूकंप: सत्तेत 'राम' उरला नाही; BJPचे चार बडे नेते 'राम राम' करणार

राजकीय भूकंप: सत्तेत 'राम' उरला नाही; BJPचे चार बडे नेते 'राम राम' करणार

Published On: Apr 20 2018 1:18AM | Last Updated: Apr 20 2018 1:18AMनाशिक : प्रतिनिधी 

देशात, राज्यात व नाशिकमध्ये ‘रामराज्य’ असले तरी या सत्तेत मात्र आता ‘राम’ उरला नाही, अशी भाजपातील काही नेत्यांची धारणा झाली असून, त्यामुळे लवकरच चार बडे नेते पक्षाला ‘राम राम’ ठोकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सर्व पक्षांचे उंबरठे झिजवून थकलेला हिरे परिवार त्यात आघाडीवर असून, सिन्‍नरचे माणिक कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल व वसंत गिते हेदेखील नाराज असल्याने लवकरच ते पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा रंगली आहे. तसे झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपात राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना सिन्‍नरमधून माणिक कोकाटे, तर नाशिकमधून सुनील बागूल व वसंत गिते यांनी त्यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तंबूत विसावा घेतला होता.पण, सत्तेत असूनही महत्त्वाचे पद मिळत नसल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. तसेच, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची गणिते लक्षात घेता या नेत्यांनी भाजपाला ‘राम राम’ ठोकण्याची तयारी केली आहे.  माजी आमदार माणिक कोकाटे भाजपात अस्वस्थ असल्याची चर्चा असून, आगामी लोकसभेसाठी नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक आहेत. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. शिवाय भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रवादीकडे लोकसभेसाठी मातब्बर उमेदवार नाही. ते बघता राष्ट्रवादीकडूनही कोकाटेंसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरच कोकाटे हे राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाले तर आश्‍चर्य वाटणार नाही. 

आणखी एक नेते वसंत गिते हे विधानसभेच्या मध्य नाशिक मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, भाजपाकडून आमदार प्रा. देवयानी फरांदे या मतदारसंघातून विद्यमान आमदार असल्याने तिकीट त्यांनाच मिळणार हे निश्‍चित आहे. शिवाय आ. फरांदे व गिते यांच्यातील विळ्या भोपळ्याचे संबंध सर्वश्रुत आहेत. या  मतदारसंघातून रिंगणात उतरण्यासाठी गिते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. 

दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजपा असा प्रवास केलेले सुनील बागूल यांचीदेखील पक्षात कुचंबणा होत आहे. त्यामुळे तेदेखील पुन्हा स्वगृही जाण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, शिवसेना सोडताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर थेट तोफ डागली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी हाच मोठा अडथळा ठरत आहे. सेनेत प्रवेशासाठी बागूल यांची जोरदार धडपड सुरू असली तरी ‘मातोश्री’कडून त्यांना अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बागूल यांनी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.

‘हिरे’ राष्ट्रवादीच्या वाटेवर 

तुरुंगात असलेले भुजबळांचे समर्थन असो की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुष्पाताई हिरे यांची त्यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट, या सर्व घडामोडींमुळे हिरे परिवार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. शिक्षक मतदारसंघाचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मात्र, सीमा हिरे विद्यमान आमदार असल्याने तिकीट मिळण्याची ही अडचण लक्षात घेता त्यांनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढवली आहे. तर अद्वय हिरे हे मालेगाव-धुळे मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे बोलले जात आहे.