Wed, Jan 27, 2021 09:27होमपेज › Nashik › नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर

Published On: Apr 21 2018 1:03AM | Last Updated: Apr 20 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, त्यामध्ये नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. या जागेसाठी 21 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यासाठीची आचारसंहिताही जारी करण्यात आली आहे. 

नाशिकसह राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांची मुदत मे आणि जूनमध्ये संपुष्टात येत आहे. या सहाही जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी घोषित केला. निवडणूक कार्यक्रमानुसार 26 तारखेला अधिसूचना घोषित केली जाणार आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 3 मे ही अंतिम मुदत असणार आहे. दुसर्‍याच दिवशी म्हणजे 4 तारखेला अर्जाची छाननी, तर 7 मेपर्यंत अर्ज माघारीची मुदत असणार आहे. मतदान 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. दरम्यान, 29 मेच्या आत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेवर गत टर्मपासून आ. जाधव यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीवेळी आ. जाधव व त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना समसमान मते मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांनी चिठ्ठी पद्धतीद्वारे जाधव निवडून आल्याचे घोषित केले. त्यावरून वाद निर्माण झाला होता. निकालाविरोधात अ‍ॅड. सहाणे यांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही. 

आ. जाधव हे यंदा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे राज्यात सध्या भाजपा व शिवसेना यांच्यातून विस्तवदेखील जात नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.त्यामुळे या निवडणुकीत युतीची आशा धूसर आहे. दरम्यान, जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे शिवसेनेने या जागेवर दावा सांगत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. नाशिक मनपात एकहाती सत्ता मिळवणार्‍या भाजपाने नगरपालिका निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. परिणामी, भाजपाच्या गोटातही या जागेवर उमेदवार देण्यासाठी पक्षांतर्गत चाचपणी केली जात आहे. सेना-भाजपाने स्वतंत्र उमेदवार दिल्यास निवडणुकीत रंगत भरणार आहे.

 

Tags : nashik, nashik news,  Local self governence, election,