Tue, Jun 15, 2021 11:22
नंदुरबार :  कोटीची खोटी पगारबिले काढली; माजी आमदाराच्या परिवारातील सदस्यांचा समावेश

Last Updated: Jun 11 2021 3:50PM

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : राजमोही येथील सातपुडा आदिवासी लोकसेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उपशिक्षक, लिपिक, शिपाई या पदांवर कोणीही कार्यरत नसतांना त्यांना हजर दाखवून, खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली.  या कागदपत्रांच्या आधारे शासनाची १ कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या फसवणुकीत तळोद्यातील माजी आमदार अभिमन्यू वळवी यांच्या परिवरातील सदस्यांचाही समावेश आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील मोठी राजमोही येथील निवृत्त शिक्षिका कुमूदिनी सुरुपसिंग वळवी उर्फ कुमूदिनी सखाराम पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर झालेल्या तपासाअंती हा गुन्हा नोंदविण्यात आला. सुमारे बारा वर्षांपासून राजमोही येथील नवापाडा विद्यालयातून हा प्रकार चालला होता. 

फिर्यादीत म्हटले आहे की, अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथील सातपुडा आदिवासी लोकसेवा मंडळाच्या पदाधिकार्‍यानी २००८ ते डिसेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्षात कार्यरत नसतांनाही उपशिक्षक, लिपिक, शिपाई या पदांवर नियुक्ती झाल्याचे आणि या पदांवर व्यक्ती कार्यरत असल्याचे खोटे कागदपत्र बनवले. याासाठी वेळोवेळी खोटे ठराव, खोटे मस्टर बनवून जोडण्यात आले. नंदुरबार जिल्हापरिषदेतील शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे ते खोटे रेकॉर्ड जोडून सुमारे १ कोटी रुपयांची पगार बिलांची मागणी केली. शिक्षण उपसंचालक यांनाही त्यासाठी आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, मुख्याध्यापकांना दम देऊन खोट्या स्वाक्षर्‍या करवून घेतल्या जाण्याची शक्यता बळावली होती. म्हणून माजी आमदार अभिमन्यू वळवी यांचे चिरंजीव युवराज अभिमन्यू वळवी, संदीप अभिमन्यू वळवी, हर्षल अभिमन्यू वळवी सर्व रा. तळोदा तसेच वासूदेव निंबा मिस्तरी, दीपक यशवंत पाडवी, यमुना रमेश वळवी या सहा जणांविरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.