Wed, Jan 27, 2021 08:27होमपेज › Nashik › महापालिकेला अखेर लाभले तीन अधिकारी

महापालिकेला अखेर लाभले तीन अधिकारी

Published On: Jul 26 2019 1:49AM | Last Updated: Jul 25 2019 10:41PM
नाशिक : प्रतिनिधी

महापालिकेतील तीन अधिकार्‍यांच्या बुधवारी (दि.24) बदल्या झाल्यानंतर त्याच्या दुसर्‍या दिवशीच गुरुवारी (दि.25) शासनाने तीन अधिकार्‍यांची उपआयुक्‍तपदी नेमणूक केल्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे महापालिकेला तीन उपआयुक्‍त लाभणार आहेत.  संबंधित अधिकारी रुजू झाल्यानंतर आयुक्‍त त्यांची जबाबदारी निश्‍चित करतील. 

सध्या विविध कर आकारणी, सामान्य प्रशासन व अतिक्रमण या तीन विभागांसाठी उपआयुक्‍त नाहीत. यापैकी सामान्य प्रशासन व अतिक्रमण या विभागांची जबाबदारी प्रभारी म्हणून विभागीय अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यापैकी प्रशासन विभागाच्या प्रभारी उपआयुक्‍त सुनीता कुमावत यांची पारनेरला बदली झाली असून, अतिक्रमण विभागाचा प्रभारी कार्यभार विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर विविध कर आकारणीचे उपआयुक्‍त महेश डोईफोडे यांची बदली पुणे महापालिकेत झाली आहे. बुधवारीच डोईफाडे, कुमावत यांच्यासह विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या बदलीचे आदेश महापालिकेला प्राप्‍त झाले. त्यानंतर गुरुवारी (दि.25) लगेचच शासनाकडून तीन अधिकार्‍यांच्या नेमणुकीचे आदेश प्राप्‍त झाले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांची नाशिक महापालिकेत उपआयुक्‍तपदी प्रतिनियुक्‍ती झाली आहेत. तसेच, इगतपुरी व त्र्यंबक उपविभागीय अधिकारी राहुल पाटील तसेच उपजिल्हाधिकारी महेश घोडे-पाटील यांची नाशिकला उपआयुक्‍तपदी प्रतिनियुक्‍तीने दोन वर्षांसाठी नाशिक मनपात नेमणूक करण्यात आल्याचे आदेश शासनाचे सहसचिव सं. श. गोखले यांनी दिले आहेत. संबंधित तिन्ही अधिकार्‍यांनी त्यांच्या मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उद्देश आहे अशी कमीत कमी तीन महिन्यांची लेखी नोटीस शासनाला दिल्यानंतर त्यांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील, असे शासन आदेशात म्हटले आहे.