Fri, Jun 05, 2020 18:04होमपेज › Nashik › 'ठरलं असताना इतरांनी बोलायची गरज नाही'

गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला!

Published On: Sep 07 2019 5:29PM | Last Updated: Sep 07 2019 5:29PM

गिरीश महाजन आणि संजय राऊतनाशिक : प्रतिनिधी

युतीबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात ठरलेले आहे. ते जो निर्णय घेतील तोच अंतिम राहिल. यामुळे युतीविषयी इतरांच्या बोलण्याला काही अर्थच नाही, असे सांगत पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

तीन दिवसांपूर्वी खासदार राऊत नाशिकमध्ये दोन दिवसांच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी युतीविषयी लोकसभेतच ठरले असून, फिप्टी फिप्टी जागा दोन्ही पक्षांना असतील, असे सांगितले. त्यासंदर्भात महाजन यांना विचारले असता त्यांनी मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला मिळालेल्या जागांचाही हिशोब मांडत या आकडेवारीवरून सामंजस्याने युतीबाबत तिघे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, इतर कोणीही नाही, अशी टिप्पणी केली.

युतीसंदर्भात बोलणे सुरू झाले आहे. मागील आठवड्यात मित्र पक्षाचे नेते रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत या सर्वांशी चर्चा झाली. त्यानंतर परवा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मी आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई अशा आमच्या तिघांमध्येही बैठक झाली असून, आमच्या मित्रपक्षांमध्ये फार मोठे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

आता लवकरच भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: लक्ष घालत आहेत. जागा वाटपात व्यवस्थित तोडगा निघेल. त्यात कोणताही अडथळा येणार नाही. आमच्या 123 जागा निवडून आल्या आहेत. त्यांच्या 62 इतक्याच जागा आहेत. असे असले तरी सामंजस्याने तोडगा निघेल. युतीत कोणताही अडथळा येणार नाही, असा विश्वास आहे. असेही त्यांनी नमूद केले. 

युतीविषयी काही बोलत असले तरी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत कुणाच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. कोणी मुख्यमंत्री ठरल्याचे म्हणत आहे तर कोणी फॉर्म्युला ठरल्याचे बोलत आहे. परंतु, तिघे जो फॉर्म्युला ठरवतील तोच अंतिम असेल, असे महाजन यांनी ठणकावून सांगितले.