Sun, Jun 07, 2020 11:51होमपेज › Nashik › नाशिक : संक्रांतीनिमित्त रामकुंडावर भाविकांची मांदियाळी(व्‍हिडिओ)

संक्रांतीनिमित्त रामकुंडावर भाविकांची मांदियाळी(व्‍हिडिओ)

Published On: Jan 14 2018 11:29AM | Last Updated: Jan 14 2018 11:29AM

बुकमार्क करा
पंचवटी : देवानंद बैरागी

आजच्या मकर संक्रांतीनिमित्त पंचवटी येथील रामकुंडावर भाविकांची मांदियाळी दिसत आहे. राज्यभरातून आलेल्या तसेच नाशिककर भाविकांनी संक्रांतीनिमत्त गोदावरी नदीत पवित्र स्‍नान केले. आज वाण देण्याची (वायन दाण) प्रथा सुवासिनी महिलांमध्ये असल्याने मोठ्या संख्येने आयाबायाही गोदाकाठी जमल्या आहेत. 

महाराष्‍ट्रात मकर संक्रांतीला फार महत्त्‍व आहे. पौष महिन्यात सूर्य आश्लेषा नक्षत्रातून मकर राशीत प्रवेश करतो म्‍हणून या उत्‍सवाला मकर संक्रांत म्‍हणतात. या दिवशी गंगा स्‍नान, जप-तप, दानधर्म ध्यान धारणा तसेच दानाला फार महत्त्‍व आहे. 

सुवासिनींमध्ये वाण देण्याची प्रथा

नाशिकमधील गोदावरी नदीत स्‍नानासाठी देशभरातून भक्‍तगण येत असतात. आज, रविवारी पहाटेपासूनच रामकुंडावर भाविकांनी स्‍नानासाठी गर्दी केली होती. तसेच महिलांमध्ये वाणांची देवघेव होत होती. या वाणामध्ये मातीचे बोळ्के, हिरवे हरबरे, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोर, उसाचा तुकडा, तिळाचे लाडू हे असते. त्यासाठी या वस्तू विक्री करण्यासाठी रामकुंड येथे विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. तसेच दीप दान करणाऱ्या महिलांची संख्याही आहे. त्यामुळे सध्या शांत असलेला हा गंगाघाट परिसर भक्तीच्या रसात चिंब झाला होता.

पार्किंगची समस्या

राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने गंगाघाट परिसरात आल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच अनेक मोठ्या बसेस मधून भाविक आल्याने वाहने पार्किंग करण्यासाठी जागा देखील शिल्लक नसल्याचे दिसून आले.