Fri, Jun 05, 2020 05:09होमपेज › Nashik › शरद पवारांच्या बीडमधील उमेदवारी घोषणेवर पंकजा मुंडे म्हणाल्या... 

शरद पवारांच्या बीडमधील उमेदवारी घोषणेवर पंकजा मुंडे म्हणाल्या... 

Published On: Sep 19 2019 12:39PM | Last Updated: Sep 19 2019 12:39PM

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेनाशिक : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल, बुधवारी बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली. यावर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार यांना बीडमध्ये येऊन उमेदवार घोषित करावे लागणे म्हणजे बीड येथील राष्ट्रवादीची स्थानिक फळी कमकुवत झाली आहे असेच म्हणावे लागेल, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी पवारांना टोला लगावला आहे. 

त्या येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होत्या. धनंजय मुंडे यांची जाहीर केलेली उमेदवारी माझ्यासाठी आव्हान नाही, असाही दावा त्यांनी केला आहे. 

परळी विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेवराईमधून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके अशी पाच जणांची यादी जाहीर केली. 

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर २०१४ मध्ये झालेल्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी बहीण-भावाची लढत झाली होती. यात पंकजा मुंडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भावाला पराभवाची धूळ चारली. पुन्हा एकदा परळीत असाच बहीण-भावाचा सामना रंगणार आहे. बहीण ग्रामविकास मंत्री, तर भाऊ विरोधी पक्षनेता असल्याने या हायव्होल्टेज लढतीकडे सार्‍या राज्याचे लक्ष असणार आहे.