Tue, Jun 02, 2020 15:00होमपेज › Nashik › 'मला तिकिट देणार नाही असे भाजपने थेट सांगितले'

'मला तिकिट देणार नाही असे भाजपने थेट सांगितले'

Published On: Oct 03 2019 3:31PM | Last Updated: Oct 03 2019 3:40PM

एकनाथ खडसेमुक्ताईनगर : पुढारी ऑनलाईन 

तब्बल १३ आयारामांना पायघड्या घालून उमेदवारी दिलेल्या भारतीय जनता पक्षाने स्वकियांना मात्र चांगलाच ठेंगा दाखवला आहे. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट सांगितल्याचे एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर या त्यांच्या मतदारंसघात बोलताना सांगितले. 

यावेळी कार्यकर्त्यांनी खडसेंना अपक्ष निवडणूक लढवण्यास चांगलाच आग्रह धरला. खडसेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. यावेळी खडसे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल असे नमूद केले. खडसेंनी कोणाला उमेदवारी द्यायची याची विचारणा भारतीय जनता पक्षाने केल्याचे सांगितले. 

भाजपकडून आतापर्यंत १३९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पहिल्या यादीत १२५ आणि नंतर १४ उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली, पण त्यामध्ये खडसेंचा समावेश केलेला नाही. खडसे यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, खडसे कन्येला मुक्ताईनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. अजूनही भाजपचे काही उमेदवार घोषित करणे बाकी असल्याने मुक्ताईनगरची उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता ताणली गेली आहे. 

एकनाथ खडसे म्हणाले, 

  • कार्यकर्त्याकडून निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांडून आग्रह 
  • मला तिकिट देणार नाही असे पक्षातून सांगण्यात आले,
  • तिकिट कोणाला द्यायचे सांगा अशी पक्षाकडून विचारणा 
  • मुक्ताईनगरमधून मुलीसाठी खडसे आग्रही 
  • पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल