Tue, Jun 02, 2020 22:18होमपेज › Nashik › उमेदवारी अपेक्षित; नाशिकचे राजकारण ढवळून काढणारी!

उमेदवारी अपेक्षित; नाशिकचे राजकारण ढवळून काढणारी!

Published On: Mar 17 2019 1:52AM | Last Updated: Mar 16 2019 8:27PM
सुधीर कावळे

राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषित झालेल्या यादीत नाशिकमधून समीर भुजबळ आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अचानक संपूर्ण जिल्ह्याचे राजकारणच ढवळून निघाले आहे. 

नाशिकमध्ये भुजबळ कुटुंबीयांपैकी कोणी तरी उभे राहणार हे उघड होते. समीर भुजबळ की छगन भुजबळ, असा प्रश्‍न चर्चिला जात होता. मध्येच समीर यांच्या पत्नी शेफाली यांचेही नाव चर्चेत आले. मात्र, स्वत: छगन भुजबळ लोकसभेच्या उमेदवारीसाठी मुळीच इच्छुक नव्हते. त्यांना राज्यातच राहण्यात रस आहे. समीर यांनी खासदारकीच्या काळात केलेल्या विविध विकासकामांचा आणि पक्षासाठी केलेल्या कामांचा आढावा छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यात ज्या पद्धतीने मांडला, त्यातच समीर यांची उमेदवारी निश्‍चित होण्याचे संकेत मिळाले आणि तसेच घडले आहे. समीर यांच्या उमेदवारीचे भुजबळ फार्मवर ज्या जल्लोषात स्वागत झाले ते पाहता भुजबळ यांचे आजही किती राजकीय बळ आहे हे दिसून आले. त्यामुळे नाशिकची लढत निदान रंगतदार होईल अशीच चिन्हे आहेत.

दुसरीकडे दिंडोरी मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना गेल्यावेळी चांगली लढत दिलेल्या भारती पवार यांना पक्षाने त्या मतदारसंघात तयारी करण्यास सांगितले होते. त्यांनीही गेली चार वर्षे मतदारसंघ पिंजून काढला. त्यामुळे त्यांनाच यंदा पुन्हा उमेदवारी मिळेल असे चित्र गेल्या महिन्यापर्यंत होते. मात्र शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतले आणि भारती पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. आता तर धनराज महाले यांच्या नावाची अधिकृत घोषणाच झाली आहे. त्यामुळे भारती पवार आता भाजपच्या वाटेवर आहेत.

येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार्‍या मेळाव्यात  भारती पवार भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी उघड चर्चा होऊ लागली आहे. पवार या माजी आदिवासी विकासमंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा. ए. टी. पवार कळवण विधानसभा मतदारसंघातून तब्बल आठ वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यापैकी तीन वेळा काँग्रेसमधून, तीन वेळा राष्ट्रवादीकडून आणि दोन वेळा भाजपकडून. त्यामुळे आता त्यांच्या सूनबाई भारती प्रवीण पवार यांनी राष्ट्रवादी सोडली तर पवार घराण्यात पुन्हा कमळ फुलणार आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते सांगत आहेत. त्यात तथ्य आहे. पण ते अर्धसत्य आहे. कारण भारती पवार यांना भाजपचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागत आहे, तोच मुळी घराण्यातील भाऊबंदकीमुळे. ए. टी. पवार यांचे दुसरे चिरंजीव नितीन पवार यांची पत्नी व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनीही दिंडोरीतूनच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळीही या दोन भावांमध्ये आणि पर्यायाने दोन जावांमध्ये असाच संघर्ष झाला होता. त्यावेळी ए. टी. पवार हयात होते. त्यांचा कल भारती यांच्याकडेच होता. परंतु नितीन यांनी तत्कालीन खासदार समीर भुजबळ, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे तुळशीपत्र जयश्री पवार यांच्या पारड्यात पाडून घेतले होते. आताही दिंडोरी येथे अलीकडेच झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीपुढे या दोन जावांच्या उमेदवारीच्या स्पर्धेचा पेच उभा राहिला होता. त्यावेळी अजित पवार यांनी आधी तुम्ही घरातील भांडण मिटवा, असा जाहीर सल्ला दिला होता. त्यानंतर जनता पार्टी आणि जनता दलाचे दिवंगत नेते हरिभाऊ महाले यांचे चिरंजीव धनराज महाले यांचा राष्ट्रवादीप्रवेश झाला आणि शुक्रवारी त्यांना उमेदवारीही मिळाली. आता भारती पवार यांच्या रूपाने पवार घराण्याचा काही भाग भाजपत आला तरी त्यामुळे विद्यमान खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होणार की राजकारणाला अन्य कलाटणी मिळणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल.