Tue, Nov 19, 2019 06:04होमपेज › Nashik › नाशिक : दुचाकीवर झेप घेत बिबट्याचा हल्ला

नाशिक : दुचाकीवर झेप घेत बिबट्याचा हल्ला

Published On: Feb 06 2018 2:47PM | Last Updated: Feb 06 2018 2:47PMइंदिरानगर : वार्ताहर

दुचाकीवर झेप घेत बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. काल (ता. ५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव खांब फाट्यावर ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, रात्री सातपूर येथील आयुर्वेदाचे चिकीत्सक संजीव कुमावत (५२) आपल्या दुचाकी (एम एच ०२ सी यु ४७७१) वरून कामानिमित्त नाशिकरोडकडे निघाले होते. पिंपळगाव फाट्याच्या जवळ आले असता जवळच्या नर्सरीमधून देान उड्या घेत बिबट्या रस्त्यावर आला आणि तिसरी उडी त्याने थेट कुमावत यांच्या अंगावर घेतली. त्यामुळे कुमावत खाली पडले. 

यामध्ये बिबट्यादेखील खाली पडला आणि मागून येणाऱ्या चारचाकीच्या प्रखर दिव्यांनी घाबरून पुन्हा त्याने नर्सरीकडे पलायन केले. कुमावत यांना तर काहीच कळले नाही. त्यांच्या मानेला आणि खांद्याला मुका मार लागला. बिबट्याने झेप थेट कुमावत यांच्या तोंडावर घेतली होती, मात्र हेल्मेटमुळे त्यांच्यावरचे संकट टळले. यामध्ये बिबट्याही जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, नागरिक देखील येथे जमा झाले. कुमावत यांना प्रथमोपचार करून पुढे पाठवण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून रात्री कुत्र्यांचे भूंकणे वाढले असून बिबट्याचा वावर असला की असे हेाते असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील रहिवासी तसेच शहर सुधार समितीचे सभापती भगवान दोंदे यांनी वनविभागाच्या अधिकारी सोनार यांची भेट घेऊन सापळा लावण्याची मागणी केली आहे.