Mon, Nov 18, 2019 22:45



होमपेज › Nashik › सिल्लोड : खेळणा धरण झाले ओव्हरफ्लो

सिल्लोड : खेळणा धरण झाले ओव्हरफ्लो

Published On: Aug 19 2019 12:50PM | Last Updated: Aug 19 2019 12:37PM

खेळणा धरण



सिल्लोड : प्रतिनिधी  

सिल्लोड तालुक्यातील खेळणा नदीवरील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून धरण (दि.१९) सोमवार रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्यात एकूण आठ धरण असून त्यातील दोन मध्यम व एक लघू प्रकल्प यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाले आहे. तीन लघू प्रकल्पात काही प्रमाणात जलसाठा जमा झालेले असला तरीही इतर दोन्ही मध्यम प्रकल्पांची जलपातळीत वाढ झालेली नसून अद्यापही ती जोत्याच्या खालीच आहे.

खेळणा नदीवरील पालोद गावाजवळ असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पाच्या आवक क्षेत्रात शनिवार व रविवार या दोन दिवसांत चांगला दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर केळगाव लघू प्रकल्प आधीच ओव्हरफ्लो झालेले असल्यामुळे पावसाचे पाणी सरळ खेळणा मध्यम प्रकल्पात आल्याने खेळणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या क्षेत्रातून पाण्याची आवक अजूनही  सुरू असल्याने धरणाच्या खाली खेळणा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या विहिरींच्या पाणी पातळीत लवकरच मोठी प्रमाणात वाढ होणार आहे. तर खेळणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या आशा वाढल्या आहेत. 

खेळणा धरण २०१५ वर्षी पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर आत्ताच्या पावसाळ्यात तीन वर्षांनंतर हे धरण यंदाच्या हंगामात ओव्हरफ्लो झाले आहे. खेळणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या खाली असलेल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाठाद्वारे किमान दोन - तीन पाणी मिळण्याची आशा यामुळे पल्लवीत झालेली आहे.

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा - अंधारी व खेळणा हे दोन मध्यम प्रकल्प व केळगाव लघू प्रकल्प असे तीन धरणात शंभर टक्के जलसाठा जमा झालेले असून तिन्ही धरण ओव्हरफ्लो झालेले आहे. त्याशिवाय तालुक्यातील रहिमाबद ३५  टक्के, उंडनगांव १९ टक्के व हळदा- जळकी १७ टक्के याप्रमाणे जलसाठा जमा झालेले असून निल्लोड व चारणेर - पेंडगाव या दोन्ही मध्यम प्रकल्पात जलसाठा आद्यपही जोत्याच्या खालीच आहे.