होमपेज › Nashik › जळगाव : पाणी पुरवठा योजनेत ८ लाखांचा अपहार 

जळगाव : पाणी पुरवठा योजनेत ८ लाखांचा अपहार 

Published On: Jan 29 2019 7:36PM | Last Updated: Jan 29 2019 7:15PM
जळगाव : प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रगणे येथील पाणी पुरवठा योजनेत 8 लाख 66 हजार 145 रूपयांचा अपहार झाल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष बाबुराव पुंडलिक पाटील व सचिव कांतीलाल दौलत पाटील यांना दोषी धरत प्रत्येकी 1 वर्ष सक्तमजुरीसह कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर यातील ठेकेदाराला दोषमुक्त करण्यात आले आहे. मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. सी.व्ही.पाटील यांनी हा निकाल दिला.

नांद्रा प्रगणे येथे 2003 या वर्षाकरिता गावात पाणीपुरवठा योजनेसाठी केंद्रशासनाने 48 लाख 8 हजार रुपयांची तरतूद केली होती. नांद्रा प्रगणे व लोहारा या पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष बाबुराव पाटील व  सचिव कांतीलाल पाटील यांच्या नावाने संयुक्त खाते असून या खात्यात तरतुदीच्या पहिल्या रकमेपैकी पहिला हप्ता 8 लाख 66 हजार रुपये तसेच लोकवर्गणीतून 4 लाख 10 हजार रुपये असे एकूण 12 लाख 22 हजार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या खात्यात जमा झाले होते.

मुल्यांकनानंतर समोर आला अपहाराचा प्रकार

पाणीपुरवठा योजनांच्या कामांबाबत निविदा प्रसिध्द करुन ठेकेदार विजय गोपीचंद पाटील यांना ठेका देण्यात आला होता. त्यासाठी खात्यात जमा रकमेपैकी समिती अध्यक्ष व सचिव यांनी 12 लाख 17 हजार रक्कम काढले. 4 विहिरींचे खोदकाम झाल्यावर काम थांबले. काम बंद झाल्याने याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार शाखा अभियंता पद्मे यांनी कामाचे मुल्यांकन केले असता, प्रत्यक्षात 3 लाख 91 हजार रुपयांचे काम झाल्याचे समोर आले. यानंतर जिल्हा परिषदेचे  ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेंद्र शंकर पंडोरे यांच्या फिर्यादीवरुन समितीची अध्यक्ष व सचिव तसेच ठेकेदार यांच्याविरोधात 8 लाख 66 हजार 145 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात भादवि कलम 409, 420 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

अशी झाली शिक्षा

पोलिसांनी चौकशीअंती दोषारोपपत्र दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यावरुन समिती अध्यक्ष बाबुराव पुंडलिक पाटील, सचिव कांतीलाल दौलत पाटील यांना दोषी धरण्यात येवून दोघांना प्रत्येकी एक वर्ष सक्तमुजरीसह कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर ठेकेदार विजय पाटील यांना दोषमुक्त करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. आर.पी.गावीत यांनी काम पाहिले. तर खटल्याकामी पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक शंकर सपकाळे यांनी काम पाहिले.