जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात मदिना मशिदीजवळ आज (दि.२८) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला. चाळीसगाव पोलिसात अद्यापही गुन्हा नोंद झाली नाही तर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात बंदुकीसह एका आरोपीला अटक करण्यात आले होते. जखमी झालेल्या व्यक्तीचे गेल्या महिन्यात भांडण झाले होते अशी माहिती समोर येत आहे.
चाळीसगाव शहरात दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवरून येत अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या गेल्या असून एक गोळी हवेत फायर झाली तर दुसरी जमिनीवर फायर झाली असून एक गोळी शेख जुगर शेख वसीम उर्फ बम्बईया याच्या मांडीला लागली आहे. दरम्यान जखमी शेखवर चाळीसगाव शहरातील देवरे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. गोळीबाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, कैलास गोंदले, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.