Wed, Sep 23, 2020 02:57होमपेज › Nashik › जळगाव : महापौरांकडून 'त्या' मद्यपी कोरोना रुग्णांची खरडपट्टी

जळगाव : महापौरांकडून 'त्या' मद्यपी कोरोना रुग्णांची खरडपट्टी

Last Updated: Jul 15 2020 1:34PM
जळगाव : पुढारी ऑनलाईन 

जळगाव शहरातील मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असलेले, दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दारूसाठी गोंधळ घालत असल्याची तक्रार महापौर भारतीताई सोनवणे यांना आज (मंगळवार) दुपारी प्राप्त झाली. त्यानुसार महापौरांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत दोन्ही मद्यपी रुग्णांची चांगलीच खरडपट्टी केली. याचबरोबर त्यांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. 

यावेळी महापौरांनी दोघांना बाहेर बोलावून त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात दारूच्या दोन बाटल्या आढळून आल्या. तसेच त्यांनी बाहेर लावलेल्या रिक्षात देखील दोन दारूच्या बाटल्या मिळून आल्या. मनपाचे डॉक्टर, सहकारी आणि सुरक्षारक्षकांशी गैरवर्तन केल्याने दोघांची रवानगी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये करण्यात आली आहे. दोन्ही मद्यपी सुरक्षारक्षकांना जुमानत नसल्याने महापौरांनी स्वतः पुढाकार घेत दोघांना चांगलीच अद्दल घडवली आहे.

दारूसाठी सुरक्षारक्षकांना केली धक्काबुक्की

मनपाच्या कोविड केअर सेंटर ४ मध्ये उपचारार्थ दाखल झालेले दोन रुग्ण रात्री मद्य सेवन करून आले होते. सकाळी देखील त्यांनी मद्य सेवन केलेले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास एक रुग्ण मद्यधुंद अवस्थेत खाली आला आणि त्याने सुरक्षारक्षकांशी वाद घातला. रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने सुरक्षारक्षक सुरक्षित अंतर ठेवून असताना देखील एक रुग्ण त्यांना धक्का मारत बाहेर पडला. सुरक्षारक्षक त्याला ओरडत असताना देखील तो बाहेरून दारूच्या बाटल्या घेऊन आल्याने त्यांनी त्याला बाहेरच अडविले. तरीही तो त्यांना न जुमानता पुन्हा खोलीत गेला.
 

 "