Thu, Jun 24, 2021 12:20
धुळे : टोसीलीझुमॅबचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पकडले

Last Updated: May 07 2021 5:04PM

संग्रहित छायाचित्र
धुळे : पुढारी वृत्तसेवा

कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टोसीलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना धुळे शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या दोघांकडून इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने वर्तवली आहे.

धुळयात साक्री रोडवर कोरोनावर उपचारासाठी वापरले जाणारे 40 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन चढ्या भावाने विक्री होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहीती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी महेश देशपांडे यांना दिली. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे, पोलीस निरीक्षक देशमुख, सहायक निरीक्षक संतोष तिगोटे यांच्यासह पथकाने साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटलजवळ सापळा लावला.

यानंतर पथकाने तयार केलेल्या डमी ग्राहक रहेमान मसादिक अन्सारी यांनी काळाबाजार करणाऱ्या एका संशयितास फोन करुन त्याच्या आईसाठी टोसीलीझुमॅब इंजेक्शन लागणार असल्याचे सांगीतले. या इंजेक्शनसाठी दीड लाख रुपये लागणार असल्याचे संबंधिताने सांगितले. हा सौदा निश्चित झाल्यानंतर संशयिताने अन्सारी यांना सेवा हॉस्पिटलजवळील सुविधा लॅबसमोर येण्यास सांगितले. यानंतर संशयिताने अन्सारीला संपर्क केला. या दोघांमधे बोलणे सुरु असतांनाच अन्सारी यांच्यासमवेत असलेल्या पंचाने रुमालाने तोंड पुसत असल्याचे दाखवत पोलिस पथकाला कारवाई करण्याचा इशारा केला.

त्यानंतर पोलिस पथकाने संबंधिताला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे नाव सुभाष कटारीया असल्याचे निश्चित झाले. त्याच्या ताब्यातुन एक इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले. हे इंजेक्शन त्याने हषिकेश बाबाजी गांगुर्डेकडून घेतल्याची माहिती दिल्याने गांगुर्डेला देखिल ताब्यात घेण्यात आले. पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला गांगुर्डे हा सेवा हॉस्पीटलचा कर्मचारी असुन विशाल कटारीया याचा सुविधा लॅबमधे वावर असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे. या दोघांकडून ताब्यात घेतलेले इंजेक्शन त्यांनी कोठून मिळवले यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.