Tue, Jun 02, 2020 23:57होमपेज › Nashik › वाहनाच्या चोरकप्प्यातून अवैध मद्यवाहतूक

वाहनाच्या चोरकप्प्यातून अवैध मद्यवाहतूक

Published On: Sep 08 2019 1:36AM | Last Updated: Sep 07 2019 8:17PM
नाशिक : प्रतिनिधी

चारचाकी वाहनात चोरकप्पा बनवून अवैध मद्यवाहतूक करणार्‍या राजस्थानमधील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अंबोली शिवारात पकडले. संशयितांकडून अवैध मद्यसाठा आणि एमएच 04 जेयु 3618 क्रमांकाची कार असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या विषयी अधिक माहिती अशी की, किशनलाल मनोहरलाल किर (वय 21) आणि कमलेश मोहनलालजी नाई (वय 24, दोघे रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे फक्त दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशात विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी आणला जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागास कळाले. त्यानुसार विभागाचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रविण मंडलिक, जवान विलास कुवर, सुनील पाटील, धनराज पवार आदींच्या पथकाने त्र्यंबकेश्वर येथील अंबोली शिवारात सापळा रचला. तेथे संशयित वाहन येताच पोलिसांनी ते अडवले. 

वाहनाची तपासणी करत असताना, वाहनाच्या पाठीमागील बाजूस काहीच नसल्याचे दिसून आल्‍याने पथक काहीसे गोंधळले. मात्र अधिक तपासणी केल्यानंतर वाहनाच्या पाट्याकडील बाजूस चोरकप्पा केल्याचे आढळून आले. पथकाने वरील पत्रा काढल्यानंतर आतील बाजूस सुमारे 30 बॉक्स विदेशी मद्यसाठा आढळून आला. पथकाने दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.