Tue, Jun 02, 2020 23:48होमपेज › Nashik › धरणांतून विसर्ग सुरू; मराठवाड्याला दिलासा

धरणांतून विसर्ग सुरू; मराठवाड्याला दिलासा

Published On: Jul 29 2019 1:18AM | Last Updated: Jul 29 2019 12:00AM
नाशिक : प्रतिनिधी

चार दिवसांपासून नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरण 76 टक्के भरले आहे. तर इगतपुरीमधील दारणा 88 टक्के भरले असून, धरणातून 23 हजार 959 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तसेच, नांदूरमध्यमेश्वरमधून 24 हजार 331 क्यूसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याने वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावले.

जूनच्या अखेरीस दमदार हजेरी लावणार्‍या पावसाने त्यानंतर तब्बल तीन आठवडे दडी मारली. गेल्या चार दिवसांपासून या पावसाने कमबॅक करत नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्याला झोडपून काढले. त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गंगापूर धरणातील साठा 4 हजार 319 दलघफूवर (77 टक्के) पोहचला आहे. धरणात दिवसभरात 133 दलघफू पाण्याची आवक झाली. दरम्यान, धरणातील आवक कायम असून धरण 80 टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. इगतपुरी तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून, तालुक्यातील सर्वाधिक मोठे धरण असलेले दारणा 87 टक्के भरले आहे. धरणात सद्यस्थितीत 6 हजार 202 दलघफू पाणीसाठा आहे. धरणात पाण्याची आवक सुरूच असून दिवसभरात 498 दलघफू पाणी आले. सायंकाळनंतर धरणातून 23 हजार 959 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीपात्रात करण्यात येत आहे. तर भावली धरणातून 1218 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, गोदावरी आणि दारणा नदीपात्रातून वेगाने पाण्याचा प्रवाह येत असल्याने नांदूरमध्यमेश्वरचे दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे धरणातून 24 हजार 331 क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. नाशिक जिल्ह्यातून जाणार्‍या पाण्यामुळे जायकवाडीच्या साठ्यात वाढ होत असल्याने मराठवाडावासीय सुखावले आहेत. 

जिल्ह्याचा साठा 37 टक्क्यांवर

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा व पालखेड धरण समूहातील प्रकल्पांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 24 प्रमुख प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 24 हजार 280 दलघफू पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी 37 आहे. गतवर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांमध्ये 37,163 दलघफू (56 टक्के) पाणी होते.