Fri, Jun 05, 2020 16:03
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य : राज्यमंत्री अर्जुन खोतकर 

उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो मान्य : राज्यमंत्री अर्जुन खोतकर 

Published On: Feb 25 2019 12:59AM | Last Updated: Feb 24 2019 11:16PM
द्वारका : वार्ताहर

जालना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुनच घेणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. रविवारी (दि.24) नाशिक दौर्‍यावर खोतकर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. परंतु, राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्याने खोतकर हे लोकसभा निवडणूक लढणार का, हा प्रश्‍न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छा खोतकरांनी व्यक्‍त केली. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. येत्या दोन ते तीन दिवसात उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आहे. 

काँग्रेसकडून तिकिटाची ऑफर मिळालेली असल्याच्या चर्चांबाबत पत्रकारांनी विचारले असता खोतकर म्हणाले की, जो काम करतो त्याला सर्वत्र मागणी असते. मात्र, मी कट्टर शिवसैनिक आहे, उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असल्याचे खोतकरांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल कदम, नगरसेवक विलास शिंदे,  छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर आदी उपस्थित होते.