Fri, Jul 10, 2020 09:27होमपेज › Nashik › नाशिकमध्ये धुवाधार

नाशिकमध्ये धुवाधार

Published On: Oct 07 2019 2:01AM | Last Updated: Oct 07 2019 2:01AM
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक शहराला रविवारी (दि. 6) पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. दुपारी 4 ते 6 या दोन तासांच्या कालावधीत शहरात तब्बल 40.8 मिमी पाऊस झाला. परिणामी, शहरातील मुख्य भाग असलेल्या दहिपूल, हुंडीवाला लेन, तसेच फूलबाजार परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरले. तर गोदावरीच्या पूरपातळीत वाढ झाली. तर वाघाडी दुथडी भरून वाहत होती. दिंडोरी व चांदवडमध्येही पावसाचा जोर कायम असल्याने द्राक्षबागांसह शेतीला फटका बसला आहे. हवामान खात्याने पुढील 48 तासांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतला आहे. नाशिक शहर व परिसरात रविवारी पावसाने काहूर माजविले. दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. यामुळे रस्ते जलमय झाले. शहरातील मुख्य भाग असलेल्या दहिपूल व सराफ बाजार परिसरात काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत तसेच कमरेपर्यंत पाणी साचले. हेच पाणी दुकानांमध्ये शिरल्याने परिसरातील व्यावसायिकांचे हाल झाले. तर शहरील शरणपूररोड, राजीव गांधी भवन परिसर, गंगापूररोड, त्र्यंबक नाक्यासह व अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने तेथून मार्गक्रमण करताना नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड आदी उपनगरांनाही पावसाने दणका दिला.

रविवारची सुट्टी असल्याने नाशिककर सहकुटुंब कालिका यात्रोत्सवात सहभागी झाले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. शहरात एकीकडे पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरी धरणातून 285 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यातच धरणाच्या खालील बाजूस झालेल्या पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होऊन गोदाघाट पाण्याखाली गेला. मात्र, वाघाडीला महापूर आल्याने खंडोबा पटांगण पाण्याखाली गेले. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत काठावरच्या नागरिकांनी सुरक्षितस्थळी आसरा शोधला. तसेच काठावरील छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यावसायिकांचे अतोनात हाल झाले. याच पुराच्या पाण्यात काठावरील काही वाहने वाहून गेल्याची चर्चा होती.

दिंडोरी तालुक्याला सलग तिसर्‍या दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यातील लखमापूर, निगडोळ, कादवा, म्हाळुंगी, करंजवण यासह इतर गावांना याचा फटका बसला आहे. सततच्या या पावसामुळे टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब व भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातवरण आहे. चांदवडमध्येही कोसळधारा सुरू असून, शहरातील खोकड तलाव ओव्हरफ्लो झाला. मनमाड शहर-परिसरालाही पावसाने झोडपून काढले. तर सिन्नरमध्येही पावसाचा जोर कायम आहे. इगतपुरीत दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. इतर तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसल्या.  अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम वातावरणावर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केले आहे. येत्या 14 तारखेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा मुक्काम असेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.