Wed, Aug 12, 2020 21:06होमपेज › Nashik › जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमोसमी पावसाचे थैमान

जिल्ह्यात ठिकठिकाणी बेमोसमी पावसाचे थैमान

Last Updated: Mar 25 2020 11:41PM
नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बेमोसमी पावसाने दुसर्‍या दिवशीही हजेरी लावली. देवळा, निफाड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सायखेडा : परिसरात पावसाने सलामी दिली. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गहू, द्राक्ष तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. या अवकाळी पावसाने काही काळ ग्रामस्थांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतीचे यामुळे नुकसान होणार आहे. शेतमालाला आधीच कमी भाव मिळत असून, त्यात वरुणराजाच्या आगमनाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुढील काळात शेतीची कामे करण्यासाठी लागणारी औषधे कशी आणावीत. तसेच, अनेक आर्थिक प्रश्‍न उभे आहेत. सध्या कोरोनामुळे देशात संचारबंदी लागू झालेली असून, त्यात पुन्हा बेमोसमी पावसाच्या रूपाने अस्मानी संकटाने भर घातल्याने शेतकर्‍यांचे धाबे दणाणले आहे. निफाड तालुक्यातील ओझर, लासलगाव, गोंदेगाव परिसरातही हलक्या सरी कोसळल्या. गोंदेगाव परिसरात गहू पिकाचे नुकसान झाले. 

निफाड : शहरासह जिल्ह्यामध्ये बेमोसमी पावसाचे थैमान तालुक्यातील चांदोरी, सायखेडा, शिंगवे, नैताळे, सोनेवाडी, शिवडी, उगाव, खडकमाळेगाव, सावरगाव, रानवड, पालखेड, कुंदेवाडी, नांदुर्डी भागात बुधवारी सायंकाळी 5.30च्या सुमारास वाजता वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे तयार द्राक्षबागांना धोका उभा राहिला आहे शेतात  मळणीसाठी ठेवला गहू, हरभरा ही पिके भिजली आहेत तर अनेक ठिकाणी झाकपाक करण्यासाठी शेतकरी कुटुंबाची धावपळ झाली होती सायंकाळपावेतो पावसाची रिपरिप सुरूच होती. चांदवड तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भिती शेतकर्‍यांमध्ये आहे.

कळवण तालुक्यात वादळी वार्‍यासह पावसाने पिकाचे नुकसान झाले. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे बेमोसमी पावसाने मोठे संकट उभे राहिले. वादळी वार्‍याने झाडांची पडझड झाली. सुरगाणा तालुक्यात वादाळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने घरांची पडझड झाली.

येवला तालुक्याच्या दक्षिण भागात सहानंतर अधिक प्रमाणात सुरु झाला. जोरदार वारा आणि विजेचा कडकडाट पाऊस कोसळला. कापणीला आलेल्या गहू, द्राक्ष, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. दिंडोरी तालुक्यात शिडकावा झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हलका पाऊस झाला. इगतपुरी तालुक्यातही तेच चित्र होते.