Sun, Jun 07, 2020 12:05होमपेज › Nashik › जिल्ह्यात संततधार; गोदावरीला पूर

जिल्ह्यात संततधार; गोदावरीला पूर

Published On: Jul 07 2019 12:07PM | Last Updated: Jul 07 2019 12:38PM
नाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी संततधार कायम असून, रविवारी (दि. 7) दिवसभर पावसाने नाशिकला अक्षरश: झोडपून काढल्याने मोसमातील पहिला गोदावरीला पूर आला.  पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. जुन्या नाशिकमधील अमरधाम परिसरात जुना वाडा कोसळला, तर नवीन कसारा घाटात ब्रेकफेल पॉइंटजवळ दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रोडवरील पिंपळगाव-बहुला येथे महामार्ग पाण्याखाली गेल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत एकूण 570.5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्र्यंबकेश्‍वरमध्ये सर्वाधिक 180 मिमी पाऊस झाला. 

जूनमध्ये जिल्ह्याकडे पाठ दाखविणार्‍या पावसाने जुुलैच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली असून, तीन दिवसांपासून नाशिक शहर व अन्य तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. नाशिक शहरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर तो सुरूच असल्याने ठिकठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले. त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. नाले व गटारींचे पाणी गोदावरीत जाऊन मिळाल्याने गोदेला मोसमात प्रथमच पूर आला. सायंकाळी 7 वाजता अहिल्यादेवी होळकर पुलाजवळ पाण्याचा वेग 6,297 क्यूसेक इतका होता. गोदेच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्याने काठावरील रहिवाशांची तारांबळ उडाली. पुराच्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडली. नासर्डी व वालदेवी नदीच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली. शहरात नाशिकरोड, सिडको, सातपूरसह अन्य उपनगरांतही पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. सिडकोत अनेक घरांमध्ये पाणी शिरले. 

त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यातही संततधार कायम आहे. त्र्यंबकेश्‍वरमध्ये सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विक्रमी 180 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे त्र्यंबकेश्‍वर शहरातील रस्ते जलमय होऊन जनजीवन कोलमडले. पिंपळगाव बहुला येथे दुपारी महामार्ग पाण्याखाली गेल्याने नाशिक व त्र्यंबकेश्‍वर यांच्यातील वाहतुकीचा संपर्क तुटला. या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. इगतपुरी तालुक्यात अस्वली स्टेशन ते मुंढेगाव रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक वळविण्यात आली. इगतपुरी रेल्वेस्थानकात सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी मुंबईकडे जाणार्‍या मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले. त्याचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसला तरी इंजिन रुळावर आणताना रेल्वे कर्मचार्‍यांची कसोटी लागली. जिल्ह्यातील पेठ, सिन्नर, दिंडोरी व सुरगाण्यातही चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली.

तर देवळा, कळवण, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, ग्रामीण भागांत भात, मका, नागलीसह खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये जिल्ह्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे.