Sun, Jun 07, 2020 10:32होमपेज › Nashik › धुवाँधार पावसाने दिंडोरीला झोडपले

धुवाँधार पावसाने दिंडोरीला झोडपले

Published On: Sep 23 2019 8:53PM | Last Updated: Sep 23 2019 8:53PM

दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपलेदिंडोरी : प्रतिनिधी

तालुक्यातील वणी शहरात सोमवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. देवी मंदिर परिसरात अनेक दुकानांत अचानक पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले. शहरात काही भागांत पाणी साचलेले होते.

सोमवारी (दि.23) दुपारी तीनच्या दरम्यान पावसाने वणीकरांना चांगलेच झोडपले. वणीच्या पूर्वेस तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी शिरले. देवी मंदिर परिसरात असलेल्या लेंडीनाल्याला मोठा पूर आला. तसेच नाल्यालगत असलेल्या फुलांच्या टपर्‍यांना पालापाचोळा मोठ्या प्रमाणात अडकल्याने मोठा पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी अडला गेल्याने यावेळी पहिल्यांदा देवी मंदिर परिसरातून पाणी वाहू लागले. हॉटेल वैभव, सलूनच्या दुकानात अचानक पाणी शिरल्याने अनेकांची धांदल उडाली. शहरातील सर्व पाणी लेंडीनाल्याकडे जमा होत गल्ल्यांमध्ये पाणी साचले होते.

नाल्याला आलेल्या पुरामुळे दुसर्‍या बाजूला सर्व शाळा असल्याने पालकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. पुराचे पाणी ओसरले असून, विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. दत्तनगरमध्येही काही भागांत पाणी शिरले होते. मंदिर परिसरात एक फुलांची टपरी वाहून गेली. परंतु, पुढच्या टपर्‍यांना अडकून राहिली होती. दरम्यान, सप्तशृंगगडावरही मुसळधार पाऊस झाला. यामुळे कडेकपारीतून पाणी वाहत होते.