Thu, Jan 28, 2021 07:37होमपेज › Nashik › धुवाधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

धुवाधार पावसाचा जिल्ह्याला तडाखा

Published On: Sep 26 2019 2:25AM | Last Updated: Sep 25 2019 11:55PM

नाशिक : बुधवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदेला आलेला पूर.(छाया : हेमंत घोेरपडे)नाशिक : प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्याला बुधवारी (दि.25) मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. इगतपुरी, निफाड, दिंडोरी, सिन्‍नर, चांदवड तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मालेगाव तालुक्यात पोहण्यासाठी गेलेले दोघे जण बंधार्‍यात बुडाले, तर नाशिकच्या सिडकोत पाण्यात वीजप्रवाह उतरून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. 

नाशिकमध्ये दुपारी 3.30 च्या सुमारास अंधारून येऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरात रस्त्यांवरून पाणी वाहून वाहतूक विस्कळीत झाली. तिडकेनगर येथील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक काही काळ बंद होती. सिडको परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला. मुख्य रस्ते जलमय झाले होते. उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलजवळ रस्ताच पाण्याखाली गेला होता.  तिथे मोठ्या (पान 1 वरून) प्रमाणात पाणी साचले होते.  त्यामुळे वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत होती. नाशिकरोड  परिसरात सकाळीच पावसाने हजेरी लावली. जवळपास पाऊण तास पावसाचा धिंगाणा सुरू होता. टाकळी येथील नासर्डी पुलावरून पाणी वाहत होते. सायंकाळी सहाला पुन्हा पाऊस सुरू झाला. तासभरापेक्षाही अधिक काळ पावसाने थैमान घातले होते. पंचवटी, जुने नाशिक या भागातही जोरदार पाऊस बरसला. दरम्यान गोदावरीला पूर आला असून दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले आहे.

इगतपुरी तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाचे बुधवारी सकाळपासून पुन्हा जोरदार आगमन झाले. नेहमीप्रमाणे चाकरमाने, शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग बाजारात आले असता पावसामुळे त्यांना भिजावे लागले. जुन्या मुंबई -आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गवर अचानक चार फूट पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अनेक वाहने व्हीटीसी फाट्यावरून रेन्फो कंपनीमार्गे वाडीवर्‍हे गावातून जात होती. दोन तासानंतर पाणी कमी झाल्याने वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आली. वाडीवर्‍हे, गोंदे, पाडळी, कुर्र्‍हेगाव, बेलगाव, मुरंबी, मुकणे परिसरात जोरदार पाऊस झाला. अति पावसामुळे शेतीचे बांध फुटले. भातपिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लियर कंपनीजवळ एक वाहन उलटले.

दिंडोरी तालुक्यातील सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या टोमॅटोचे पीक संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, ननाशी, परमोरी, वलखेड, वरखेडा या भागात जोरदार सरी बरसल्या. दुसर्‍या टप्प्यात दिंडोरी, जानोरी, मोहाडी, पालखेड भागात दीड तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी होते. नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.

मालेगाव, कळवण, पेठ, सुरगाणा, देवळा, सटाणा तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. येवला तालुक्यातील अंदरसूल, पिंपळगाव जलाल, येवला, नागडे या दक्षिण-पूर्व पट्ट्यात जोरदार हजेरी लावली. नांदगाव तालुक्यात साडेसात वाजेच्या सुमारास पावसाने मध्यम स्वरुपाची हजेरी लावली.

चांदवड तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे तालुक्यातील छोटे-मोठे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. तालुक्यातील केद्राई, जांबुटके, राहुड धरण भरून वाहत आहे. तसेच, चांदवड शहरातील खोकड तलाव 70 ते 80 टक्के भरला असून, येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास लवकरच भरेल. सिन्‍नर तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाने शेती व खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सिन्‍नर शहरात सायंकाळच्या सुमारास एका तासात 52 मिमी पाऊस पडला. बोरखिंड परिसरात मुसळधार पावसात गाय व म्हैस वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.25) सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली.

ठाणगावसह परिसरातील पाडळी, टेंभुरवाडी तसेच शिवडा, पांढुर्ली, सोनांबे, कोनांबे परिसरात टोमॅटो, वालवड, वटाणा, कोथिंबीर आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि.24) रात्री 11 वाजेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. देवनदी, म्हाळुंगीलाही पुन्हा पूर आला. देवीची खिंड परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला. 

बोरखिंड शिवारात मुसळधार पावसात धरणाच्या सांडव्याच्या प्रवाहात शरद नारायण लोहरे यांची गाय व म्हैस वाहून गेली. सायंकाळी घराकडे परतणारी आणखी काही जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

धरणातील पाणीपातळी वाढली...

जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरलेली असून, बुधवारी दिवसभर पडलेल्या पावसाने यात भर पडली. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता. गंगापूर धरणातून 1,713 क्युसेक तर कश्यपी धरणातून 211 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दारणा धरणातून 8,985 क्युसेकने तर भावली धरणातून 290 क्यूसेकने पाणी सोडले जात होते. भावली धरण क्षेत्रात 41, दारणा धरणक्षेत्रात 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाऊस सुरूच असल्याने पाण्याचा विसर्गही सुरू होता. त्यामुळे गोदावरी, नासर्डीची पाणीपातळी वाढली होती. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अफवांवर कोणीही विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. पालखेड धरणातून 2,625 क्युसेक पाणी तर आळंदी धरण परिसरात 70 मिमी पाऊस पडला असून, 86 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अहिल्याबाई होळकर पुलाखाली 18,210 क्युसेक पाण्याचा वेग असल्याची नोंद करण्यात आली आहे.