Tue, May 26, 2020 11:43होमपेज › Nashik › 'पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जनजीवन कोलमडले असतानाही, मुख्यमंत्री जागावाटपात व्यग्र' (Video)

'पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जनजीवन कोलमडले असतानाही, मुख्यमंत्री जागावाटपात व्यग्र' (Video)

Published On: Sep 26 2019 1:58PM | Last Updated: Sep 26 2019 3:36PM
नाशिक : प्रतिनिधी

पुण्यासह कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत मुसळधार पावसाने हाहाकार उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र युतीच्या जागा वाटपात व्यग्र आहेत, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केला. यामुळे शरद पवार यांच्या पाठोपाठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भुजबळही आक्रमक झाल्याचे दिसून येत असल्याने निवडणुकीचा फड चांगलाच गाजणार आहे.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (दि.26) बैठक होत आहे. या बैठकीसाठी देखील भुजबळ नाशिक येथून दुपारी रवाना होणार आहेत. या बैठकीमुळे भुजबळ यांनी आपल्‍या नाशिक जिल्ह्यातील बैठका व इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्या वेळी देखील मुख्यमंत्री आपल्या सहकार्‍यांसह महाजनादेश यात्रेत गर्क होते. त्यावेळी त्यांनी वेळीच यात्रा सोडून कोल्हापूर, सांगली सातारा येथे धाव घेतली असती, तर झालेली जिवित व वित्तहानी आणखी काही प्रमाणात टाळता आली असती. दोन दिवस आधीच आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत कर्नाटकशी बोलणे झाले असते, तर परिस्थिती नियंत्रणात आली असती. मात्र मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रा महत्वाची वाटली असावी, असा उपरोधिक टोला भुजबळ यांनी मारला. 

आताही पुणे, कोल्हापूर सांगलीसह सातार्‍यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना मुख्यमंत्री मात्र बैठकांमध्ये व्यग्र आहेत. त्यांना जागा वाटप महत्वाच्या वाटत असल्याचा आरोप भुजबळांनी केला. मुंबई आणि नागपूरबरोबरच पुणे हे शहर देखील अत्यंत महत्वाचे आहे. त्याठिकाणी मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. पावसामुळे कामकाज ठप्प पडले आहेत. उपाययोजना करण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.