Sun, Jun 07, 2020 11:49होमपेज › Nashik › सिल्लोड : परतीच्या पावसाने झोडपले

सिल्लोड : परतीच्या पावसाने झोडपले

Published On: Sep 18 2019 2:30PM | Last Updated: Sep 18 2019 2:30PM
सिल्लोड : प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात आज परतीच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अर्ध्या भागावर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भागांतील अनेक गांवात पाणी शिरले. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने भागातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली असून काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. यामुळे नागरिकांना आहे त्याठिकाणी थांबावे लागले. या पावसाने घाटनांद्रा, अंभई, अजिंठा, गोळेगाव व पालोद परिसरातील अनेक भागांतील नदी नाले दुथडी वाहून जात असून रस्त्यांवर दुतर्फा पाणीच पाणी झालेले आहे.  

सिल्लोड तालुक्यातील केळगाव, खेळणा, अजिंठा - अंधारी, कासोद - धामणी धरण जलसाठे ओव्हरफ्लो झालेले असून घाटनांद्रा, हळदा - जळकी, उंडनगांव, रहिमाबद हे धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील पालोद, सारोळा, रहिमाबद, गोळेगाव, अजिंठा, अंभई, उंडनगांव, पानवडोद, शिवना, आमठाणा या भागांत (दि.१७) मंगळवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. झालेल्या या पावसाने त्या भागांतील नदी नाले ओसंडून दुथडी वाहत असून रस्त्यांवर आल्याने काही काळासाठी या भागातील रहदारी व वाहतूक ठप्प झाली होती. 

आमठाणा, केळगाव, अंभई परिसरात परतीचा मुसळधार पाऊस झाल्याने नदी- नाले दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनी शाळेत जाणे टाळले आहे. पालोद, चांदापुर, चिंचपूर, माडंना, चारनेर व आमठाणा गावात पाणी शिरले असून पालोद मुख्य रस्ता, पालोद - मंगरूळ तसेच घाटनांद्रा- आमठाणा - देऊळगाव बाजार गावांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.