होमपेज › Nashik › तरुणीने मॉडेलिंगसाठी रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

मॉडेलिंगसाठी रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट

Published On: Mar 22 2018 1:45AM | Last Updated: Mar 22 2018 12:10PMनाशिक : प्रतिनिधी

मुंबईत मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी एका 19 वर्षीय तरुणीने दोन मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचून कुटूंबियांकडे 7 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावला. अपहरण आणि खंडणी मागणार्‍या एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेत साहिल महिंद्र भांगरे (20, रा. पाथर्डी फाटा) या युवकास अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिका पाहून अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान, दोघा संशयितांनी खंडणी मागण्यासाठी एका मुलाचा मोबाइलही चोरला आहे. सातपूर पोलिसांना सायंकाळी 5 नंतर परिसरातील एका कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करीत अपहरणकर्त्यांनी 7 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे सांगितले. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तपासास सुरुवात केली. तक्रारकर्त्यांची 19 वर्षीय मुलगी मंगळवारी (दि.20) सकाळी 6.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे अशोकस्तंभ येथील क्‍लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली.

सकाळी 10 वाजता मुलगी घरी न आल्याने तिच्या पालकांनी क्‍लासमध्ये फोन करून मुलीची विचारपूस केली. त्यावेळी सकाळी नऊ वाजताच मुलगी क्‍लासवरून घरी गेल्याचे समजले. मात्र, दुपार होऊनही मुलगी घरी आली नव्हती. दरम्यान, सायंकाळी 4.40 वाजेच्या सुमारास मुलीच्या पालकांना एक फोन आला व समोरील व्यक्‍तीने ‘मै बंबई वडाळासे वसीम बोल रहा हू, अगर आपको आपकी लडकी चाहिए तो 7 लाख रुपये रेडी रखो’ असे सांगत त्याने फोन कट केला. त्यानंतर संशयितांनी वारंवार त्याच मोबाइल क्रमांकावरून मुलीच्या घरच्यांना फोन करून खंडणीची मागणी केली. 

पोलिसांनी तातडीने तपासास सुरुवात करून संबंधित मोबाइल क्रमांकाची माहिती घेतली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून दोघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन संशयित असून, दुसरा साहिल महिंद्र भांगरे (20, रा. पाथर्डी फाटा) याचा समावेश होता. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे ज्या मोबाइलवरून मुलीच्या नातलगांना फोन केले जात होते, तो मोबाइलही सापडला. तसेच, मुलीकडे विचारपूस केली असता तिने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. त्यामुळे मुलीसह दोघा संशयितांनी अपहरण आणि खंडणीचा बनाव रचल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.  याप्रकरणी अल्पवयीन संशयितासह साहिल विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्‍त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे व त्यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली. 

संशयितांनी मोबाइलही चोरला

पोलीस तपासात संशयित साहिल व त्याचा मित्र ज्या मोबाइल क्रमांकावरून मुलीच्या घरच्यांना फोन करीत होते, तो मोबाइल क्रमांक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी एक पथक जळगावला पाठवून तपास केला. त्यावेळी मोबाइलधारक युवक परीक्षा देण्यासाठी नाशिकला आला असता संशयित साहिल व त्याच्या जोडीदाराने मेसेज पाठवण्यासाठी युवकाकडून मोबाइल घेतला व दुचाकीवरून पळ काढल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दोघा संशयितांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्‍त सचिन गोरे यांनी दिली. 

तपासाची दिशा वारंवार बदलली

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीस पोलिसांना मुलीच्या पालकांनी त्रोटक माहिती दिली. त्यातच खंडणीसाठी येणारा फोन जळगावचा असल्याने पोलिसांनी रात्रीतून जळगाव गाठून चौकशी केली. त्यावेळी मुलाने माझा मोबाइल चोरीला गेल्याचे सांगितल्याने तपासी पथक पुन्हा रिकाम्या हाती फिरले. त्यानंतर मात्र पोलिसांनी मुलीच्या पालकांसह मित्रांकडे चौकशी केल्यावर अल्पवयीन संशयितासह साहिलचा पत्ता सापडला. त्यानंतर सुमारे 12 तासांच्या मेहनतीनंतर बनाव उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

 

Tags : Nashik , Nashik News, crime, kidnapping, girl conspiracy,