Fri, Jun 05, 2020 06:01होमपेज › Nashik › भागीदारीच्या आमिषातून पावणेतीन कोटींचा गंडा 

भागीदारीच्या आमिषातून पावणेतीन कोटींचा गंडा 

Published On: Aug 22 2019 1:49AM | Last Updated: Aug 22 2019 12:05AM
नाशिक : प्रतिनिधी

कंपनीत भागीदार करून दरमहा मानधन, शेअर्स देण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने गुंतवणूकदारांना सुमारे पावणेतीन कोटी रुपयांना गंडवले आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्पर्म प्रोसेसर प्रा. लि. कंपनीचे संचालक प्रमोद बजाज आणि मीना प्रमोद बजाज (दोघे रा. औरंगाबाद) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल सतीशचंद्र जैन (47, रा. तिडके कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 24 फेब्रुवारी 2015 ते 24 फेब्रुवारी 2016 या कालावधीत टिळकपथ रोडवरील आठवले चेंबरमध्ये संशयितांनी गंडा घातला. स्पर्म प्रोसेसर कंपनीत पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 20 टक्के शेअर्स व एका व्यक्‍तीला कंपनीच्या संचालकपदी घेऊ. तसेच त्या संचालकास दरमहा दीड लाख रुपये मानधन मिळू शकेल, असे आमिष संशयितांनी दाखवले. भारतात कंपनीच्या शाखा उघडणार असून, त्यातून दरमहा 9 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळेल असेही संशयितांनी सांगितले. त्यामुळे जैन यांच्यासह इतर गुंतवणूकदारांनी दोन कोटी 71 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, संशयितांनी ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेत तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाने संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.