Wed, Aug 12, 2020 20:56होमपेज › Nashik › चांदवडला सापडलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशचाच!

चांदवडला सापडलेला शस्त्रसाठा उत्तर प्रदेशचाच!

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 17 2017 12:03AM

बुकमार्क करा

चांदवड : वार्ताहर

चांदवडला सापडलेला संपूर्ण शस्त्रसाठा हा उत्तर प्रदेशातील बांदा येथील न्यू पंजाब मेसर्स आर्म शॉप या दुकानातील चोरीचाच असल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. यासंदर्भात उत्तर प्रदेशातील पोलीसपथक, एटीएसचे सर्व वरिष्ठ अधिकारी नाशिकला संशयित आरोपींची कसून चौकशी करीत आहेत. घटनेत वापरलेली बोलेरो गाडी अंधेरी पश्‍चिम (मुंबई) येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले असून, या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील न्यू पंजाब मेसर्स आर्म हे शस्त्रास्त्रे विक्रीचे दुकान बद्रीनुजमान अकबर बादशहा उर्फ सुमित उर्फ सुका (27, रा. शिवडी. मुंबई), सलमान अमानुल्ला खान (19, शिवडी मच्छी गोदाम, मुंबई), नागेश राजेंद्र बनसोडे (23, रा. वडाळा मुंबई) आणि इतर चार साथीदारांनी मिळून मंगळवारी (दि.12 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास फोडले. हे दुकान लुटण्यापूर्वी बादशहाने एक बस चोरली होती. चोरलेली बस बांदा येथील न्यू पंजाब मेसर्स आर्म दुकानासमोर उभी केली. गाडी दुकानासमोर का उभी केली, असे तेथील वॉचमनने विचारले असता, बादशहाने त्यास मारझोड करीत बांधून ठेवले. त्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी दुकान फोडून आत प्रवेश केला. या धाडसी चोरीत बादशहा व त्याच्या साथीदारांनी दुकानातील 48 रायफल व 4142 काडतूस चोरल्याचे समजते. हा सर्व चोरीचा माल बोलेरो गाडीत टाकून पोबारा केला. बांदा येथील चोरीची घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या घटनेसंदर्भात बांदा येथील कोतवालीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

या चोरीनंतर बादशहासह एकूण सात जण बोलेरो गाडीत बसून मुंबईच्या दिशेने निघाले होते. शस्त्रे लुटल्यावर रस्त्याने प्रवास करीत असताना गाडीतील बादशहाचे काही साथीदार ठिकठिकाणी उतरत गेल्याचे पोलीस चौकशीत स्पष्ट होत आहे. मालेगाव येथील पेट्रोलपंपावर डिझेल भरले, तेव्हा चार जण गाडीत होते. मात्र, गाडीत डिझेल भरल्यावर पेट्रोलपंप मालकास पैसे न देता पळ काढल्याने गाडीतील एक जण खाली उतरून गेला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. उर्वरित बादशहा व दोन जण हे भरधाव चांदवडला आले आणि चांदवड पोलिसांच्या ताब्यात सापडले. तेथूनच या संपूर्ण घटनेचे बिंग फुटले.

चांदवड येथे पकडलेल्या गाडीतील शस्त्रांवर उत्तर प्रदेशातील बांदा येथील दुकानाचे स्टिकर आढळून आल्याने ही सर्व हत्यारे चोरीची असल्याचे जवळपास पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या उद्देशाने नाशिकचे स्थानिक गुन्हे शाखा व एटीएसचे पथक बांदा येथे चौकशी करीत आहे. तसेच, बांदा येथील पोलीस उपअधीक्षक राघवेंद्रसिंग यांचे पथक चौकशीसाठी नाशिकला पोहोचले आहे. या संपूर्ण घटनेची उकल करण्यात पोलिसांना लवकरच यश मिळणार असल्याचे समजते.