Wed, Jun 03, 2020 09:46होमपेज › Nashik › मांडूळ तस्करीच्या वादातून धुळे जिल्ह्यात गोळीबार

मांडूळ तस्करीच्या वादातून धुळे जिल्ह्यात गोळीबार

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 23 2018 1:10AMधुळे  : यशवंत हरणे

मांडूळ सापाच्या तस्करीतून साक्री तालुक्यातील जामदे गावात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या घटनेच्या वृत्ताला जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

साक्री तालुक्यात जामदे गावातील काही तरुण मांडूळ सापाची तस्करी करण्याचे काम करतात. यासंदर्भात यापूर्वीही  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. गत आठवड्यात परप्रांतीय तरुणांनी या गावातील दोघा तरुणांना मांडूळ (साप) खरेदी करण्यासाठी संपर्क केला. यानंतर या गावातील दोघांनी सौदा करून रबरी ट्यूबमधे मांडूळ टाकल्याचे नाटक करीत परप्रांतीय तरुणांकडून पैसे उकळले. यानंतर संबंधित तरुण त्यांच्या गावी गेल्यानंतर त्यांना ट्यूबमधे मांडूळाऐवजी माती भरल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी जामदे गावातील या तरुणांशी संपर्क करत फसवणूक केल्याचे कारण विचारले असता जामदेकरांनी त्यांना कमी पैसेदिल्याने असे केल्याचे सांगितले. त्यानंतर हे युवक पुन्हा जामदे गावात पैसे देण्यासाठी पोहोचले. त्यांनी जामदेकरांना गावाच्या बाहेर बोलावून घेतले. यानंतर संबंधीत ठिकाणी वाद झाल्यानंतर जामदे येथील दोघा तरुणांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. यात जखमी झालेल्या एकास औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तर दुसर्‍या तरुणास गावातच लपवून ठेवल्याची माहीती आहे. या प्रकरणाची माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने गावात जाऊन चौकशी सुरू केली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित माहिती मिळत नसल्याने पोलिसांनी गुप्त माहितीदारांच्या आधारावर तपास सुरू केला आहे. दरम्यान, गोळीबार झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दुजोरा दिला आहे. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी अद्यापही कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झालेला नाही. घटनेबाबत माहिती घेऊनच गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.