Thu, Jan 21, 2021 01:16होमपेज › Nashik › खडसे यांच्यापुढे सेनेचा अडथळा

खडसे यांच्यापुढे सेनेचा अडथळा

Last Updated: Oct 09 2019 10:33PM
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील काही लढतींनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. जळगाव जिल्ह्यात अकरा मतदारसंघ असले तरी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील लढत ही हायव्होल्टेज बनली आहे. 

आधी एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीवरून आणि नंतर शिवसेना उमेदवाराची बंडखोरी आणि राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यामुळे ‘मुक्ताई’ नेमकी कुणाला पावणार? याकडे लक्ष वेधले गेले आहे. मुक्ताईनगरमधून यावेळी एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी यांना भाजपने अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. शिवसेनेने ‘युतीधर्म’ पाळण्याऐवजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र पाटील यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगून राष्ट्रवादीनेही बंडखोर चंद्रकांत पाटील यांच्यामागे राष्ट्रवादीने आपले बळ उभे केले आहे. आधी उमेदवारीसाठी झगडणार्‍या खडसेंना आता मुलीला निवडून आणण्याचे मोठे आव्हान आहे. राजकीय क्षेत्रात टिकून राहण्यासाठी खडसेंसाठी ही लढत राजकीय अस्तित्वाची परीक्षा पाहणारी आहे.

जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाच्या मार्गात भाजपचे नगरसेवक चंद्रकांत अत्तरदे यांच्या उमेदवारीचे ‘काटे’ अडसर ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन, लकी टेलर हे रिंगणात असले तरी भाजपचे अत्तरदे यांनी सर्व ताकद पणाला लावल्याने सेनेच्या उमेदवाराची कोंडी झाली आहे.

नंदूरबार मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.  भाजपचे शहादा-तळोद्याचे आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसचा ‘हात’ धरत  नंदूरबार मतदार संघातून डॉ. गावित यांच्याविरोधात बंड थोपटले आहे. गावित यांची कन्या हीना गावित या भाजपच्या खासदार आहेत. तर विजयकुमार गावित हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

धुळे मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्याविरोधात लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे यांनी आव्हान निर्माण केलेेले असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अपक्ष ‘एन्ट्री’मुळे येथील लढत लक्षवेधी बनली आहे. 

- भागवत उदावंत