Tue, Jun 02, 2020 14:57होमपेज › Nashik › नाशिककरांनी चौथ्यांदा अनुभवला महापूर!

नाशिककरांनी चौथ्यांदा अनुभवला महापूर!

Published On: Aug 05 2019 1:25AM | Last Updated: Aug 05 2019 12:39AM
नाशिक : गौरव जोशी

मुसळधार पावसामुळे गोदावरीने रौद्र रूप धारण केले असून, नदीच्या महापुराने निम्मे नाशिक पाण्याखाली गेले आहे. या पुरामुळे नाशिककरांच्या महापुराच्या आठवणी ताज्या झाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1969 पासून ते आजपर्यंत चार वेळेस गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नाशिककरांनी चौथ्यांदा महापुराचा अनुभव घेतला. दरम्यान, महापुराची मानके म्हणून ओळख असलेल्या नारोशंकराच्या घंटेला पुराचे पाणी लागले आणि दुतोंड्या मारुतीही पुरामध्ये बुडाला. तसेच, सरकारवाड्याच्या पायरीलाही पुराचे पाणी लागले हे यंदाच्या पुराचे विशेष. 

गोदाकाठी वसलेल्या नाशिकनगरीने सर्वप्रथम 9 सप्टेंबर 1969 रोजी गोदावरीचे रौद्र रूप अनुभवले. त्यावेळी सराफ बाजारातील सरकारवाड्याच्या सातव्या पायरीला पुराच्या पाण्याचा स्पर्श झाला. त्याकाळी लोकसंख्या मर्यादित असल्याने शहराला त्याचा फारसा फटका बसला नाही. परंतु, हा पहिला महापूर असल्याने सरकारवाड्याची पायरी ही पूरपातळीची निशाणी ठरविण्यात आल्याची माहिती शहरातील जाणकारांनी दिली. नाशिकमध्ये येणार्‍या आप्तस्वकीय व नातेवाइकांना नाशिककर हमखास पुराची ही निशाणी दाखवित. मात्र, 2008 च्या पुराने ही ओळख पुसली गेली. तब्बल 39 वर्षांनी म्हणजेच 17 सप्टेंबर 2008 ला गोदावरीला दुसर्‍यांदा महापूर आला. 2008 मध्ये त्र्यंबकेश्वर आणि गंगापूूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग पाऊस सुरू होता. त्यावेळी धरणातील साठा 95 टक्क्यांवर पोहोचला.

परिणामी, पाटबंधारे विभागाने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू केला. त्यामुळे पुन्हा एकदा शहराने महापूर अनुभवला. त्यानंतर आठ वर्षांनी 2016 मध्ये गोदावरीच्या पुराने अर्धे नाशिक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. नाशिकमध्ये 2016 च्या जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल 8 दिवस हा पाऊस सुरू होता. त्यामुळे गोदावरीने 3 ऑगस्ट रोजी धोक्याची पातळी ओलांडली. गंगापूर धरणातून तब्बल 42 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात होता. पावसाचा जोर कायम असल्याने तब्बल 24 तासांहून अधिक काळ शहरातील विविध भागांमध्ये पुराचे पाणी साचले होते. त्याचवेळी नांदूरमध्यमेश्वरमधून 2 लाख 82 क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत होते. 2016 च्या मान्सूनमध्ये तब्बल 66 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचल्याने धरण 100 टक्के भरले. धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केल्याने मराठवाडावासीय सुखावले होते.  यंदा जूनच्या अखेरीस हजेरी लावणार्‍या पावसाने नंतर दडी मारली.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने तडाखा दिला आहे. त्र्यंबकेश्वर आणि गंगापूरच्या वरील भागात झालेल्या पावसामुळे गोदेने शनिवारी (दि. 3) रात्री धोक्याची पातळी ओलांडली. महापुराचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे नाशिककरांच्या मागील तिन्ही महापुरांच्या आठवणी ताज्या झाल्या. दरम्यान, पूर ओसरल्यानंतरच खर्‍या अर्थाने नुकसानीची तीव्रता समजणार आहे. त्यामुळे ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!’ या  कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीप्रमाणे नाशिककर पुन्हा उभारी घेतील, यात शंंका नाही. 

तेव्हा झाली होती 1969 ची आठवण

सन 2008 मध्ये अवघ्या आठ तासांमध्ये गोदेने काठावरील परिसर कवेत घेतला. विशेष म्हणजे 1969 पेक्षा या पुराची तीव्रता अधिक होती. त्यावेळी सराफ व भांडीबाजारासह दहीपूल परिसरातील शेकडो व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. तर नदीकाठी राहणार्‍या नागरिकांचे संसार या पुरात वाहून गेले.