Wed, Jun 03, 2020 22:22होमपेज › Nashik › परताव्याच्या आमिषाने १०५ तोळे सोन्याचा अपहार

परताव्याच्या आमिषाने १०५ तोळे सोन्याचा अपहार

Published On: Sep 09 2019 1:33AM | Last Updated: Sep 09 2019 1:33AM
नाशिकरोड : वार्ताहर

सुवर्ण सिध्दी योजनेतंर्गत वर्षभरात 12 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून येथील दंडे प्रा.लि.चे मालक मिलिंद मधुसूदन दंडे यांनी गुंतवणुकदारांच्या तब्बल 105 तोळे सोन्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे येथील महिलेने उपनगर पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे येथील स्वाती संजय महाजन यांनी उपनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2016 मध्ये एका दैनिकामध्ये दंडे ज्वेलर्सची सुवर्ण वृद्धी योजनेची माहिती समजली. त्यानुसार सुवर्ण वृद्धी योजनेत 40 तोळे सोने गुंतवले. त्यानंतर दोन वर्षे 12 टक्क्यांनी परतावा मिळाला. यावर विश्वास बसल्याने पुन्हा 40 तोळे सोन्याची गुंतवणूक केली. त्याची मुदत 31 मार्च 2019 रोजी संपत असल्याने  गुंतवणूक केलेले  सोने काढून घेण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये  दंडे यांच्या दुकानात गेलो. यावेळी त्यांनी एक महिन्याने सोने देतो असे सांगून, मुदतीच्या तारखेला तुमचे सोने व पैसे परत मिळतील, असे  दंडे यांनी सांगितले. त्यानंतर एचडीएफसी बँकेचा 1 लाख 53हजार रुपयांचा धनादेश आपल्याला दिला.तो  न वटल्याने दंडे यांना नोटीस पाठवली. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी रोख पैसे दिले. मात्र, सोने नंतर देतो सांगितले. तथापि, सोने देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. इतरही दोन महिलांचे  65 तोळे सोने दंडे यांनी परत न करता ते हडप केल्याचे फियादीत म्हटले आहे.  या प्रकरणी उपनगरला गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक एस.जी. जगदाळे तपास करीत आहेत.